Sanjay Raut | ‘ईडी दहशतवादी संघटना’, संजय राऊत यांचं धक्कादायक वक्तव्य
ठाकरे गटाकडून यूट्यूबवर 'आवाज कुणाचा' असा कार्यक्रम पॉडकास्ट केला जातोय. या पॉडकॉस्टमध्ये ठाकरे गटाच्या विविध नेत्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. संजय राऊत यांचीदेखील मुलाखत या कार्यक्रमात घेण्यात आली आहे.
मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : “ईडी ही दहशतवादी संघटना आहे”, असं धक्कादायक वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवाय उंचावल्या आहेत. ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात कारवाई सुरु आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली. ईडीच्या तपासात अनेक महत्त्वाची माहिती समोर आली. ईडीने मुंबई क्राईम ब्रांचलाही ही माहिती दिल्याची माहिती समोर आली होती. ईडीकडून देशभरात कारवाई केली जात आहे. अनेक विरोधी पक्षातील बडे नेते ईडीच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून ईडीवर टीका केली जातेय.
ठाकरे गटाकडून यूट्यूबवर ‘आवाज कुणाचा’ असा कार्यक्रम पॉडकास्ट केला जातोय. या पॉडकॉस्टमध्ये ठाकरे गटाच्या विविध नेत्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. संजय राऊत यांचीदेखील मुलाखत या कार्यक्रमात घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा ट्रेलर आता समोर आला आहे. या व्हिडीओत संजय राऊत भाजपवर सडकून टीका करत आहेत. विशेष म्हणजे ईडीला दहशतवादी संघटना म्हणताना दिसत आहेत.
संजय राऊत काय-काय म्हणाले? त्यांचे वक्तव्ये जसंच्या तसे
- मराठी माणूस, त्याला तुम्ही भिकारी, दरिद्री म्हणत होता, घाटी, कोकणी म्हणून हिणवत होता, त्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी ही शिवसेना स्थापन झाली.
- आता मित्र पक्षांनी फसवलं, म्हणून शिवसेना थांबली का? शिवसेना संपली का?
- शिवसेना म्हणजे अग्निकुंड आहे. शिवसेना आग आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं.
- उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून त्यांनी बाळासाहेबांची संघटना दोन पावलं पुढे नेली आहे.
- भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली त्याला क्षमा नाही.
- ते घाबरतात. महापालिका निवडणुका घेत नाही, लोकसभा निवडणुका घेतील का? ही चिंता आहे. जनतेला घाबरतात. जो जनतेला घाबरतो तो नेता नाही.
- जगभरातील 100 भ्रष्टाचारी गोळा करायचे आणि आपल्या पक्षात घ्यायचे, हा कोणता मॅडिट आहे? याला मॅडिट नाही म्हणत. व्यापार म्हणतात.
- ईडी ही एक दहशतवादी संघटना आहे. आपल्या घराचा ताबा घेतात. त्यांच्या बापाचं घर असल्यासारखं.
- जिथे कसाब होता तिथेच मी होतो. जेलमध्ये मतदान घेतलं असतं तर 90 टक्के मते शिवसेनेला मिळाली असती. शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. शिवसेना ही महाराष्ट्रासाठी संघर्ष करण्यासाठी जन्माला आली आहे. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल
संजय राऊत यांचा व्हिडीओ पाहा
संजय राऊत यांनी ईडीबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. संजय राऊत ईडीबद्दल नेमकं काय म्हणाले याबाबत त्यांची सविस्तर मुलाखत प्रक्षेपित झाल्यावर समोर येईलच. पण त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.