‘सरकार स्वत: गॅसवर, म्हणून…’, भाजपची खरंच धाकधूक वाढली? उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

| Updated on: Aug 30, 2023 | 4:41 PM

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील नागरिकांसाठी सरसकट 200 रुपयांनी गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांना आज मविआच्या बैठकीत प्रश्न विचारण्यात आला.

सरकार स्वत: गॅसवर, म्हणून..., भाजपची खरंच धाकधूक वाढली? उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा
Follow us on

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : इंडिया आघाडीच्या बैठकीआधी महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांची आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. “देशातील सर्व माता-बघिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधन केवळ एका दिवसासाठी असायला नको. प्रत्येक दिवस महिला सुरक्षेचा असला पाहिजे. असं शासन असलं पाहिजे. दुर्देवाने तसं शासन दिसत नाही. मी मधल्या काळात त्यावर भाष्य केलं होतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं होतं की, मुस्लिम महिलांकडून राखी बांधा. मी म्हटलं की, बिल्कीस बानोकडून सुरुवात करा, मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढली गेली, दिल्ली आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू महिलांना सुरक्षित वाटेल असं सरकार असायला हवं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही एकत्र आलो आहोत, कारण आम्हाला देशाची रक्षा करायची आहे. आम्ही तानाशाही, जुमलेबाजीच्या विरोधात आहोत”, असं ठाकरे म्हणाले.

‘सरकार स्वत: गॅसवर’

“आमची तिसरी बैठक होत आहे आणि आता गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. आमची बैठक जसजशी पुढे जाईल तसं दर कमी होतील. आम्ही जसे पुढे जाऊ तसं कमी होतील. काही दिवसात तर गॅस मोफत दिलं जाईल कारण सरकार स्वत: गॅसवर आहे. त्यामुळे सिलेंडरचे भाव कमी केले असतील तर मला काही आश्चर्य वाटत नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“9 वर्षे झाली, आजपर्यंत कधी बहिणींची आठवण आली नव्हती. आज अचानक बहिणींची आठवण आणि रक्षाबंधनचं गिफ्ट दिलं. मग गेल्या 9 वर्षात रक्षाबंधन झालं नव्हतं का? भाऊबीज 9 वर्षात झाली नव्हती का? पब्लिक सब जानती है. काहीही केलं तरी त्यांना कुणीही वाचवू शकत नाहीत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“नाना पटोलेंनी मला सांगितलं की ते महायुतीची बैठक घेत आहे. घ्या बैठक, पण त्या बैठकीत केवळ आमचा विरोध करु नका. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळासारखी परिस्थिती आहे. पंतप्रधान मोदी भुलभुलया दाखवून चालले जातील. संकट काळात केली जाणारी मदत महत्त्वाची आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

मुंबईचं पूर्ण वातावरण इंडियामय झालंय. इंडियाच्या फक्त तीन बैठका होत आहेत, पण ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या हे इंडिया आघाडीच्या दोन बैठकांची ताकद आहे. माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव मुंबईत काल येत होते तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की लालूजी मुंबईत का जात आहात? तर त्यांनी सांगितलं की, मोदीजींच्या नरडीवर बसण्यासाठी जात आहे. ही वैयक्तिक लढाई नाही. पण तानाशाहीच्या विरोधात ही लढाई आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी संपू्र्ण तयारी झालीय. महाराष्ट्रात येणाऱ्या पाहुण्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे पाहुणचार केला जाईल. चीनने आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या काही भागावर दावा केलाय. बैठकीची तयारी झालीय. जसं इंडिया पुढे जाईल तसं चीन मागे हटेल

अशोक चव्हाण काय म्हणाले?

आपल्याला जशी बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तशी आपल्या इंडियाच्या संरक्षणाची सर्वांची जबाबदारी आहे. पहिल्या बैठकीत 26 होते आता 28 पक्ष सहभागी झाले आहेत. सर्व पक्षाचे सहकारी बैठकीच्या यशासाठी काम करत आहेत. याआधी दोन बैठका झाल्या. आता तिसरी बैठक मुंबईत होत आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. संतांची, शाहू, फुले, आंबेडकरांची ही भूमी आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे.

महाराष्ट्र प्रत्येक क्रांतीत पुढे राहिला आहे. महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केलं आहे. मुंबई देशाचं केंद्रबिंदू बनला आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षांना 23 कोटी 40 लाख मते मिळाली होती. तर भाजपला 22 कोटी 90 लाख मते मिळाली होती. पण तरीही भाजप सत्तेत आली.

इंडिया आघाडीत 11 मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. मध्यप्रदेश, गोवा, महाराष्ट्र सारख्या राज्यांना तोडण्याचा काम भाजपने केलं. कर्नाटकात सरकार तोडल्यानंतरही नागरिकांनी आमचं सरकार आणलं आहे. महाराष्ट्रातही आमच्या मविआचं सरकार येईल. कुणाला विरोध करणं हा आमचा अजेंडा नाही. विकासाचा अजेंडा आहे.

शरद पवार काय म्हणाले?

इंडिया आघाडीची बैठक उद्या होणार आहे. विविध पक्षांचे 63 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. देशाच परिवर्तन करण्यासाठी ही आघाडी मजबूत असणार आहे.