उद्धव ठाकरे शिंदे गट-भाजपविरोधात जंग जंग पछाडणार, मार्च महिन्यात मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
निवडणूक आयोगाचा निकाल लागल्यापासून ठाकरे गटात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाला घेरण्यासाठी आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेगळी रणनीती आखली आहे.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि चिन्हाबद्दल दिलेल्या निकालावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला त्याचदिवशी रात्री साडेआठ वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना जीपवर चढून संबोधित केलं. त्यापाठोपाठ त्यांनी आज सुद्धा पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग, शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधाला. निवडणूक आयोगाचा निकाल लागल्यापासून ठाकरे गटात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाला घेरण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी वेगळी रणनीती आखली आहे.
राज्यात सध्याच्या घडीला अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या घडामोडी गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने घडत आहेत. विशेष म्हणजे या घडामोडी लवकर थांबण्याची शक्यता फार कमी आहे. कारण शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं असलं तरी ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या घडामोडी घडवण्याबाबतचे संकेत मिळत आहेत. याशिवाय पुढच्यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत.
उद्धव ठाकरे विरोधकांची मोट बांधणार
राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. या निवडणुकांमधून राज्यातील नागरिकांचा नेमका मूड काय आहे? ते स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे प्रत्येक पक्ष आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रणनीती आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एकटं पाडण्यासाठी उद्धव ठाकरे देशातील विरोधकांची मोट बांधणार आहेत.
मार्चमध्ये मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गट देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुंबईत सभा आयोजित करणार आहे. येत्या मार्च महिन्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांचं सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा देशातील विरोधी पक्षातील अनेक राष्ट्रीय नेत्यांशी दूरध्वनीवर संवाद सुरु आहे.
उद्धव ठाकरेंची ‘या’ नेत्यांशी चर्चा
उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरुन संवाद साधलाय. याशिवाय ठाकरे आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांना मुंबईत भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलंय. या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचं मुंबई भेटीचं निमंत्रण स्वीकारलं तर ठाकरे गटाकडून विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी मुंबईत एक भव्य सभा आयोजित करण्याचा प्लॅन आहे. ही सभा येत्या मार्च महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे.