विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा, अनिल परब यांना संधी मिळणार की काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मागील विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. त्यामुळे ते या पदासाठी एकत्र आले तर त्यांचे एकत्रित संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त असेल. अशा स्थितीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे विधान परिषद पक्षनेते पद येण्याचीही शक्यता आहे.
मुंबई- विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे हे पद देण्यात आले. मात्र आता विधान परिषदेच्या (Vidhan Parishad)विरोधी पक्षनेत्यावर तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत ११ संख्याबळ असलेल्या शिवसेनेने या पदावर दावा केल्याची माहिती आहे. विधान परिषद सभापतींना विरोध पक्षनेतेपदावर दावा सांगणारे पत्र शिवसेनेकडून (Shivsena)देण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे विधान परिषदेत १०-१० आमदारांचं संख्याबळ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मागील विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. त्यामुळे ते या पदासाठी एकत्र आले तर त्यांचे एकत्रित संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त असेल. अशा स्थितीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे विधान परिषद पक्षनेते पद येण्याचीही शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंची पसंती अनिल परब यांना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऍड अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनवण्याच्या तयारीत आहेत. अनिल परब हे विधान परिद सदस्य असून, ते उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले मानले जातात. ते स्वता वकील असल्याने त्यांचा कायद्याचा अभ्यासही चांगला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात परब यांच्याकडे परिवहन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच संसदीय कार्यमंत्रीपदही त्यांच्याकडे होते. मात्र शिवसेनेचे संख्याबळ ११ असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे एकूण २० जण आहेत, अशा स्थितीतमहाविकास आघाडीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी स्पर्धा असल्याचे दिसते आहे.
राष्ट्रवादींकडून एकनाथ खडसेंचे नाव
राष्ट्रवादीचा आग्रह एकनाथ खडसे यांच्या नावासाठी आहे. उ. महाराष्ट्रातील मोठे नेते असलेल्या खडसेंकडे विरोधी पक्षनेतेपद आल्यास ते सराकरला धारेवर धरतील अशी शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात मंत्रिपद गमावल्य़ानं ते नाराज होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. आता त्यांना विधान परिषदेवरही संधी मिळाली आहे. अनेक वर्षांचा अनुभव असणारे खडसे विधान परिषदेत सरकारला आक्रमक आव्हान उभं करु शकतात.
काँग्रेसमध्ये मोहन कदम, राजेश राठोड, सतेज पाटील यांची नावे चर्चेत
तर काँग्रेस पक्षात यासाठी कोल्हापूरचे सतेज पाटील, मोहन कदम आणि राजेश राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. आगामी नगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढायचे ठरवले असल्यास शिवसेनेच्या परब यांची निवड सहज होण्याची शक्यता आहे. दुसरीकडै राष्ट्रवादी, काँग्रेस काय भूमिका घेणार, य़ाकडेही सगळ्यांचं लक्ष असेल.