मुंबई: शिवसैनिकांनी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर भाजप (bjp) नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. अचानक धावून आलेल्या जमावाने कंबोज यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कंबोज हे रेकी करत असल्यााचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ही दुर्देवी घटना आहे. मातोश्रीवरून जात असताना एखाद्यावर हल्ला करणं हे चुकीचं आहे. अशा प्रकारचा हल्ला करणं योग्य नाही. आपलं सरकार आहे म्हणून हल्ला करण्याता आला काय? शिवसैनिकांना कायदा हाता घेण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दुर्देवी स्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यावर हल्ला करणं यावरून राज्य नेमकं कुठं चाललं आहे हे दिसून येतं. मोहित कंबोज हे मातोश्रीसमोरच्या प्रमुख रस्त्यावरून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचं शिवसैनिकांचं काहीच कारण नव्हतं. अशा प्रकारचा हल्ला करणं योग्य नाही. सरकार आपलं आहे या संरक्षणात हल्ला करणं योग्य नाही. शिवसैनिकांचं म्हणणं काही असेल पण त्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिला. परवा पोलखोल यात्रेवर दगडफेक केली. जर कोणी रेकी करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश द्यावे. गृहमंत्र्यांना सांगून कडक कारवाई करावी. पण यांचा कायद्यावर विश्वास नाही. आमच्यावर टीका करणाऱ्यांना ठोकून काढू असं वातावरण होताना दिसतंय. महाराष्ट्र अराजकतेकडे जातो की काय असं दिसून येतंय, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. नेमकं काय झालं मला माहीत नाही. तुम्ही म्हणता तसं झालं असेल तर हे गृहस्थ जाणून बुजून त्या मार्गाने जात होते. शिवसैनिकांना डिवचण्यासाठी जात होते का असा संशय मनात येतो. पोलीस आहेत. बॅरेकेड आहेत. पर्यायी मार्ग असताना हाच मार्ग का स्वीकारला. कुणी शिवसैनिकांना जाणूनबुजून डिवचत असेल तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील. हा रेकीचाच प्रकार होता. कंबोजचं बॅकग्राऊंड पाहिलं तर ते या कामात एक्सपर्ट आहे. शिवसेनेला त्रास देण्याचे जे प्रकार झाले त्यात कंबोज आघाडीवर होते. नवनीत राणांसाठी ते रेकी करत असतील म्हणून कदाचित शिवसैनिकांचा उद्रेक झाला असेल, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं.
संध्याकाळच्या सुमारास मोहित कंबोज वांद्रे येथील मातोश्री बंगल्यावरून जात होते. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकही होते. सुरक्षा रक्षकांसोबतची गाडी पाहून शिवसैनिकांनी या गाडीत डोकावून पाहिलं असता त्यात त्यांना कंबोज बसलेले दिसले. शिवसैनिकांनी कंबोज यांना खाली उतरण्यास सांगितले आणि अचानक त्यांच्यावर हल्ला केला. तर, आम्ही एका पत्रकाराच्या लग्नाला गेलो होतो. तिथून येत असताना माझी गाडी पुढे गेली आणि कंबोज मागे राहिले. त्यांना एकटं गाठून शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला, असं भाजप नेते प्रसाद लाड यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Video : मातोश्रीसमोरच मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला! कलानगर परिसरात गोंधळ
Maharashtra News Live Update : मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला