‘त्यांची लायकी सिल्वर ओकच्या….’, शिवसेना महिला नेत्याचा ठाकरे गटाच्या खासदारावर हल्लाबोल
दसरा मेळाव्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. शिंदे आणि ठाकरे गट आक्रमक झाला. परस्परांना शब्द बाणांनी घायाळ करण्याची मालिका सुरु झाली आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंनी परस्परांवर जोरदार टीका झाली होती. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत.
मुंबई (गिरीश गायकवाड) : भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे गटाला शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने लक्ष्य करत असतात. मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला आता शिवसेनेच्या महिला नेत्या प्रा डॉ ज्योती वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेलं आहे. त्यामुळे कुठल्यातरी चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे जाऊन शॉक ट्रीटमेंट घेण्याची त्यांना गरज आहे. संजय राऊत कोणाच्या इशाऱ्यावर भुंकतात आणि नैराश्यांना ग्रस्त होऊन कसे थंकतात? हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलेल आहे” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.
“भारतीय संविधानानुसार भारत एक संघराज्य आहे आणि दिल्ली ही देशाची राजधानी आहे. जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात, चर्चा करतात तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ते महत्वाचे असते. दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले आहे की छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून महाराष्ट्राचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते कटीबद्ध आहेत” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या. ‘त्यांची लायकी सिल्वर ओकच्या पायपुसण्याइतकीच’
“ज्यांची लायकी ही काँग्रेस आणि सिल्वर ओकच्या पायपुसण्याइतकीच आहे, त्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये” अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या प्रा डॉ ज्योती वाघमारे यांनी केली. “एकनाथ शिंदे यांना काहीही बोलू द्या. त्यांनी शिवसेना शब्दच उच्चारू नये. स्वयंघोषित शिवसेनेचे मुख्यमंत्री होतात. भांडी भाजपची घासतात आणि गुणगाण भाजपच्या नेत्यांचं करतात. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असूच शकत नाही. थोडा स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला” अशी टीका संजय राऊत यांनी केली.