Eknath Shinde : फक्त शिवसेनेच्याच नावावर लोक निवडून येत नाहीत, तुमच्या बापाचं नाव वापरा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचं उत्तर
शिवसेनेच्या बापाच्या नावावर मते मागू नका, स्वत:च्या बापाच्या नावावर मते मागा, असे संजय राऊत म्हणाले होते. त्याला केसरकरांनी अशाप्रकारे जळजळीत असे प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यासोबतच संजय राऊतांना टोला लगावताना ते म्हणाले, की संजय राऊत यांची ही बोलण्याची पद्धत आहे, याला आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही.
मुंबई : लोक फक्त शिवसेनेच्याच (Shivsena) चिन्हावर निवडून येत नाहीत. तसे असते तर शिवसेनेचे सर्वच्या सर्वच निवडून आले असते, अशी जळजळीत प्रतिक्रिया शिंदे गटाकडून देण्यात आली आहे. मते ही केवळ शिवसेनेच्या नावेच मिळत नाहीत, असाच अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे. मते मागताना शिवसेनेच्या बापाच्या नावाने मागू नका, तर स्वत:च्या बापाच्या नावाने मागा, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. त्याला शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. उमेदवाराचे सुद्धा त्यात श्रम असतात अधिक पक्षाची मते असतात. अशी मते प्रत्येक पक्षाकडे असतात. जशी ती शिवसेनेकडे आहेत, तशी ती काँग्रेसकडे आहेत, राष्ट्रवादीकडे आहेत, तशीच ती भाजपाकडेही आहेत, असा टोला दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला आहे.
‘सर्वच पक्षात असतात असे उमेदवार’
पुढे ते म्हणाले, की आम्ही सध्या कोणाच्याच नावावर मते मागितली नाहीत, कारण अडीच वर्षांनंतर निवडणुका आहेत. आम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नाही. आपल्या विधानसभेत जवळपास 80 ते 100 उमेदवार असे आहेत, जे कोणत्याही पक्षाकडून लढले तरीही निवडून येतील. राधाकृष्ण विखे पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आधी ते काँग्रेसमधून निवडून आले, नंतर भाजपात गेले. तिथेही निवडून आले. असे उमेदवार असतात. कारण त्यांचे काम त्यांच्या मतदारसंघात, जिल्ह्यात असते. आपण त्याला चॅलेंच करू शकत नाही.
‘राऊतांना फारसे गांभीर्याने घेत नाही’
शिवसेनेच्या बापाच्या नावावर मते मागू नका, स्वत:च्या बापाच्या नावावर मते मागा, असे संजय राऊत म्हणाले होते. त्याला केसरकरांनी अशाप्रकारे जळजळीत असे प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यासोबतच संजय राऊतांना टोला लगावताना ते म्हणाले, की संजय राऊत यांची ही बोलण्याची पद्धत आहे, याला आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही. दरम्यान, शिवसेनेची कार्यकारिणी दुपारी झाली. त्यानंतर पक्षातील बंडखोर आमदारांवर कारवाई होणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. मात्र दीपक केसरकरांच्या प्रतिक्रियेवरून ते सध्या तरी महाराष्ट्रात परत येतील, अशी शक्यता कमी असल्याचे दिसत आहे.