Maratha Morcha : आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू: संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे. आता केंद्राने तात्काळ त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी करतानाच आमच्याकडे चावी आहे, आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न उघडू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (shivsena leader sanjay raut reaction on maratha muk morcha in kolhapur)
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलनाची सुरुवात झाली, त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री यांना साकडे घातले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची प्रमुख भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. मराठा आरक्षणाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हे सर्व शांतपणे आणि सुरळीत पार पडेल आणि केंद्र सरकार या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल अशी आम्हाला खात्री आहे, असं राऊत म्हणाले.
चावी होती म्हणून तुमच्या सत्तेला टाळं
यावेळी राऊत यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली. मला चावी दिली जाते असं दानवे म्हणत आहे. खरंतर चावी द्यावीच लागते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अनेकजण चावी देत असतात. सल्ले देत असतात. त्यामुळेच सरकार चालतं. चावी देणं म्हणत असाल तर चावी फार महत्त्वाची आहे. दीड वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती. त्यामुळे तुमच्या सत्तेला टाळं लागलं. आणि आमच्या सत्तेचं टाळं उघडलं. चावी आणि टाळं फार महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात. आमच्याकडे चावी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू, असं ते म्हणाले. दानवे मित्रं आहेत. उत्तम विनोद करतात. चांगलं ग्रामीण नेतृत्व आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कोल्हापुरात मूक मोर्चा सुरू
दरम्यान, कोल्हापुरात मराठा आरक्षण मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हा मूक मोर्चा सुरू झाला आहे. श्रीमंत शाहू महाराजही या मोर्चाला उपस्थित आहेत. या मोर्चाला स्वत: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर उपस्थित आहेत. तसेच आमदार, खासदार आणि अनेक मंत्र्यांनी या मोर्चाला हजेरी लावली असून भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मोर्चा स्थळी जाऊन भाजपच्या पाठिंब्याचं पत्र संभाजी छत्रपती यांना दिलं. या मोर्चामध्ये शेकडो आंदोलक सहभागी झाले आहेत. काळा पोशाख परिधान करून हा मूक मोर्चा सुरू आहे. (shivsena leader sanjay raut reaction on maratha muk morcha in kolhapur)
Maratha Morcha Kolhapur Live : मराठा मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात, कोल्हापुरात पावसाची रिपरिप https://t.co/cFCwsAXBJC #MarathaMorcha | #Kolhapur | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2021
संबंधित बातम्या:
Maratha Morcha Kolhapur Live : मराठा मोर्चाला सुरुवात, आंदोलनस्थळी आमदार-खासदारांची हजेरी
Maratha Morcha : शाहू महाराजांनी आरक्षणाची बीजं कशी पेरली?; वाचा, सविस्तर
(shivsena leader sanjay raut reaction on maratha muk morcha in kolhapur)