राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य
राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीचे नेतेच ठरवतील | Dhananjay Munde
मुंबई: खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Shivsena MP Sanjay Raut backs Dhananjay Munde )
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असेही राऊत यांनी म्हटले.
‘राष्ट्रवादीचे नेतृत्त्व सुजाण आणि प्रगल्भ, योग्य निर्णय घेतील’
धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच सोडावे, असे राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची आठवण करुन दिली होती. तेव्हादेखील गोपीनाथ मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
‘राजकारणात शिखरावर जाण्यासाठी कष्ट करावे लागतात, आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे’
कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळे एका क्षणात चिखलफेक करुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही ही गोष्ट शिकलो आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर
बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. रेणू शर्मा या महिलेने त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती.
हे संपूर्ण प्रकरणच खळबळजनक असल्यामुळे सध्या प्रसारमाध्यमांकडून धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. प्रसारमाध्यमांचा हा ससेमिरा टाळण्यासाठीच धनंजय मुंडे प्रत्येक ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेत आहेत.
गुरुवारी पहाटेदेखील मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?
धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?
नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य
(Shivsena MP Sanjay Raut backs Dhananjay Munde )