अनिल देशमुख, आर्यन खान, नवाब मलिकांचे जावई ते एकनाथ खडसे; संजय राऊतांच्या ‘रोखठोक’ 5 भूमिका
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोकमधून महाराष्ट्राच्या सध्याच्या घडीच्या हॉट टॉपिकस प्रकरणांवरती आपलं सडेतोड मत मांडलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आर्यन खान ड्रग्ज केस, मंत्री नवाब मलिकांचे जावई यांच्यावरती केलेली एनसीबी कारवाई ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेला ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आदी प्रकरणांवर राऊतांनी सडेतोड मत मांडलं आहे.
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोकमधून महाराष्ट्राच्या सध्याच्या घडीच्या हॉट टॉपिकस प्रकरणांवरती आपलं सडेतोड मत मांडलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आर्यन खान ड्रग्ज केस, मंत्री नवाब मलिकांचे जावई यांच्यावरती केलेली एनसीबी कारवाई ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेला ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आदी प्रकरणांवर राऊतांनी सडेतोड मत मांडलं आहे तसंच केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊतांच्या रोखठोक 5 भूमिका
अधिकाऱ्याचे हवेतले आरोप; माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेत
दिवाळीनंतर महाराष्ट्रातील आणखी काही मंत्र्यांना तुरुंगात पाठवू अशी वाचाळकी भाजपचे लोक रोज करतात. मंत्र्यांची नावे घेऊन ते वायफळ बडबड करतात. तुरुंगात पाठवणार म्हणजे ते काय करणार? राज्याचे माजी गृहमंत्री हे ‘ईडी’च्या कोठडीत आहेत. परमबीर सिंग या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याने हवेत आरोपांचे बार उडवले व ते अदृश्य झाले. त्या अदृश्य आरोपांवर भाजपने गोंधळ घातला.
ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सने सात वेळा देशमुख यांच्या घरावर धाडी घातल्या. देशमुख आता ईडी कार्यालयात गेले व त्यांना अटक केली. ज्या अधिकाऱ्यांवर खून, खंडणी, भ्रष्टाचाराचे गुन्हे मुंबई पोलिसांनीच दाखल केले, त्यांच्या हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते व पुढच्या चोवीस तासांत हेच परमबीर सिंग महाशय चांदिवाल आयोगासमोर एक प्रतिपादन देतात की, ‘अनिल देशमुख यांच्या विरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत!’ आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्याने आरोपच नाकारले.
तरीही अनिल देशमुखांना अटक व त्याआधी यथेच्छ बदनामी केली. देशमुख हे कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत व भाजप त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा व विकृत तानाशाही आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत केंद्रीय तपास यंत्रणांचा हा अतिरेक खपवून घेतला जात आहे.
आर्यन खान ड्रग्ज केस
शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत तेच घडले. आर्यन खान याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ‘ड्रग्ज’ सापडले नाही. तरीही प्रसिद्धी, पैसा व भाजपचा दबाव यामुळेच त्याला अटक झाली. 26 दिवस आर्यन व त्याचे मित्र तुरुंगात राहिले. पुन्हा हे बेकायदेशीर कृत्य करणाऱया एनसीबीच्या अधिकाऱयांच्या मागे भारतीय जनता पक्ष टाळय़ा पिटत उभा राहिला. हे रोगट मानसिकतेचे लक्षण आहे.
रिया चक्रवर्ती केस, नवाब मलिक यांच्या जावयावर एनसीबीने केलेली कारवाई, एकनाथ खडसे चौकशी प्रकरण
रिया चक्रवर्तीवर अन्याय झाला तेव्हाही मीडिया व राजकारणी गप्प राहिले. आर्यन खान, अनिल देशमुखांच्या बाबतीत आणि तंबाखूस ‘ड्रग’ ठरवून अटक केलेल्या समीर खान (नवाब मलिक यांचे जावई) यांच्या बाबतीतही महाराष्ट्र, सरकार व लोक गप्प राहिले. अशाने भाजप व केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढत आहे. एकनाथ खडसे यांचे जावई तुरुंगात आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुतणे तुरुंगात आहेत. या सगळ्यांनी इतके महिने तुरुंगात राहावे व त्यांना जामीनही मिळू नये असे कोणते भयंकर गुन्हे केले आहेत? यावर आता खुली चर्चा व्हायला हवी.
सरकारने, सरकार चालविणाऱ्यांनी नागरिकांवरील अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहायचे नाही तर काय करायचे?
सरकारने, सरकार चालविणाऱ्यांनी आपल्या नागरिकांवरील अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहायचे नाही तर काय करायचे? प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी ती हिंमत दाखवली. शरद पवार या मनमानीवर बोलत आहेत. राहुल गांधीही आवाज उठवत आहेत आणि उद्धव ठाकरे बोलू लागले. हे बोलणे व्यक्तिगत नको. हा आवाज सामुदायिक आणि बुलंद हवा. राज्याचा गळा दाबण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार जे राजकारण करीत आहे ते लोकशाही, संविधानाची हत्या करणारेच आहे. अशा प्रकरणांत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा बुरखा रोज फाटतो आहे. त्या बुरख्याखाली भाजपचा चेहरा लपला आहे.
(Shivsena MP Sanjay Raut Saamana Rokhthok Comment On Aryan Khan Anil deshmukh Nawab Malik Son in Law Eknath Khadase Case)
हे ही वाचा :
पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का, दिल्लीत आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; मोदी-शहा आखणार नवी रणनीती
आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडेंचा संबंध आहे का?; विजय पगारे यांनी केला मोठा खुलासा