दिल्ली सरकारचा ‘ब्रँड ऍम्बेसेडर’ बनताच सोनूवर आयकर विभागाची धाड, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल, राऊतांचा इशारा
सिनेअभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने अचानक धाडी टाकल्या आहेत. याच विषयावरुन आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आलीय.
मुंबई : सिनेअभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने अचानक धाडी टाकल्या आहेत. याच विषयावरुन आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आलीय. सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत, असा दावा अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलाय. तसंच तुमचा हा पोरखेळ डाव एक दिवस तुमच्याच अंगावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरु झाला. बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता. तेव्हा ”जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?” असले पाणचट प्रश्न विचारण्यात आले. दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत.
तोपर्यंत सोनू भाजपचा होता, पण इतर सरकारांशी हातमिळवणी सुरु करताच सोनू करबुडवा झाला
सोनू कोरोना काळात मजुरांना मदत करीत होता. सोनूने देशातील 16 शहरांत ऑक्सिजन प्लॅण्ट लावले, स्कॉलरशिपची योजना सुरू केली. त्या माध्यमांतून त्याचा बोलबाला झाला. या कार्यक्रमांना भाजपचे लोकही उपस्थित राहत. महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी सोनूस राजभवनावर बोलावून खास चहापान केले. तोपर्यंत सोनू हा या मंडळींना आपला, म्हणजे भाजपचा अंतरात्मा वाटत होता. सोनू महाशय जे महान समाजकार्य करीत आहेत त्यामागे फक्त भाजपचीच प्रेरणा, परंपरा आहे, असे ठासून सांगितले जात होते, पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळविण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असे ठरविण्यात आले.
महाविकास आघाडीचे मंत्री सुटले नाहीत तसा सोनू सूदही सुटला नाही
आयकर विभागाने सोनूला पिळून काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जे भाजपशी संबंधित नाहीत अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करायचा हे एक धोरण ठरले आहे. त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मंत्री सुटले नाहीत तसे सोनू सूदसारखे कलाकार व सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत.
भाजपवाले स्वतःच्या बाथरुममध्ये घुसावे तसे रोज ‘ईडी’ कार्यालयात घुसतात
केंद्रीय तपास यंत्रणांच्या भुताटकीने गेल्या काही महिन्यांत अनेकांना पछाडले आहे. महाराष्ट्रातील मंत्री अनिल देशमुख, अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक यांना या तपास यंत्रणांच्या जाळय़ात अडकविण्याचाच डाव आहे. भाजपचे काही चवचाल पुढारी हे स्वतःच्या बाथरुममध्ये घुसावे तसे रोज ‘ईडी’ कार्यालयात जाऊन मोकळे होत आहेत. हा इतका आत्मविश्वास आणि धैर्य वरच्यांच्या पाठबळाशिवाय येणे शक्यच नाही.
अशा विकृत लोकशाहीचा उदय देशाला मारक
कोणीतरी एक गुन्हेगार, बडतर्फ अधिकारी आरोप करतो, त्याच्याकडून ‘आरोप’ वदवून घेतले जातात व त्याबरहुकूम केंद्रीय तपास पथके भाजपविरोधकांच्या हात धुऊन मागे लागतात. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आता आरोपबाज सोमय्यांवर खटले दाखल करून ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ अशी भूमिका घेतलीच आहे. राज्य सरकारला बदनाम करायचे, भाजपचे सरकार येनकेन प्रकारे येत नसेल तर तुमच्या सरकारलाही काम करू देणार नाही हे दळभद्री प्रकार सूडबुद्धीने सुरूच आहेत. जे आमचे चरणदास होणार नाहीत ते आमचे दुष्मन, त्यांना भरडून टाकू, अशा विकृत लोकशाहीचा उदय होणे देशाला मारक आहे.
भाजप सर्वाधिक सदस्येचा पक्ष, मनंही मोठं हवं
विध्वंसक, चुकीच्या माणसांना हाती धरायचे, त्यांना आर्थिक व दिल्लीच्या सत्तेचे पाठबळ द्यायचे व महाराष्ट्रातील लोकांवर घाणेरडे आरोप करायला लावायचे. त्या आरोपांची थुंकी झेलण्यासाठी मग तपास यंत्रणा तयारच आहेत. राज्यांच्या अधिकारांवर गदा आणून काही जण हे ‘बलप्रयोग’ करीत आहेत. प. बंगालात, महाराष्ट्रात, केरळात, तामीळनाडूत या ‘बलप्रयोगां’ना अपयश आले तरी विरोधकांना चिरडणे, भरडणे थांबलेले नाही. भारतीय जनता पक्ष हा जगभरात सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठय़ा राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
((Shivsena Sanjay Raut Attacked BJP over income tax department raid on actor sonu sood)
हे ही वाचा :
सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबविताना मोकळ्या जागा, पार्किंग आदींचे नियोजन करावे, अजित पवारांची सूचना