मुंबई : मुलुंडमध्ये अनधिकृत दुकानांवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्याला शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाने मारहाण केली आहे. पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी गेल्यावर याआधीही अनेक वेळा हल्ले झाले आहे. पण शिवसेनेच्या शाखाप्रमुखाकडून मारहाण झाल्याने संतापाचे वातावरण आहे. पालिका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर मुलुंड पोलिसांनी या शाखाप्रमुखावर गुन्हा दाखल केला आहे. वैशाली नगरमधील अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टी वार्डच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली.
अनधिकृत दुकानांवर कारवाई करुन अधिकारी कार्यलयात परत जात असताना रस्त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आनंद पवार यांनी त्यांना अडवले. पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने त्यांना आनंद पवार यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली.
पालिकेचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साळवे यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असताना या शाखा प्रमुखाने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
शाखाप्रमुखाकडून झालेल्या मारहाणीनंतर पालिका अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पालिका अधिकाऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. शिवसेना शाखा प्रमुखावर गुन्हा दाखल झाला असून आता पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.