एसटीच्या संपाला ब्रेक लागेना! आणखी 380 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त
मागील काही दिवसांपासून ही कारवाई केली जात असून आज आणखी 380 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा 618 वर पोहोचला आहे.
मुंबई : गेल्या 2 आठवड्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अजून ब्रेक लागलेला नाही. सरकारने वेळोवेळी नोटिसा धाडूनही कर्मचारी सेवेत रुजू होण्यास राजी झालेले नाही. अशा परिस्थितीत सरकारनेही कारवाईचा कठोर बडगा उगारत सेवा समाप्तीचे शस्त्र उपसले आहे. मागील काही दिवसांपासून ही कारवाई केली जात असून आज आणखी 380 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा 618 वर पोहोचला आहे. तसेच आज 161 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यामुळे संपादरम्यान निलंबित झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2937 झाली आहे.
आज 380 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त
एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे लालपरीला ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सेवा समाप्तीचे शस्त्र उगारून संपकर्त्या कर्मचाऱ्यांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच हेतूने महामंडळाने हालचाली सुरु केल्या आहेत. या कारवाई अंतर्गत एसटी महामंडळाने शुक्रवारी 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ शनिवारी आणखी 380 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून महामंडळाने आपली कारवाई तीव्र केली आहे. सरकार आणि आंदोलक एसटी कर्मचारी अशा दोन्ही बाजूंकडून चर्चेदरम्यान तोडगा निघण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे एसटी संपाचा तिढा अजून तरी कायम आहे. दिवाळीपासून राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी सेवा ठप्प आहे. परिणामी राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत.
नागपूर विभागात आणखी 50 जणांची सेवा समाप्त
एसटी कर्मचार्यांचा संप चिघळला आहे. काही एसटीचे चालक-वाहक कामावर परत आले. पण, काही एसटी कर्मचारी कामावर परत येत नाहीत. त्यामुळं नागपूर विभागातील 50 रोजंदारी कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यांना कामावर हजर राहण्याची नोटीस दिली होती. पण, ते कामावर हजर झाले नाही. त्यामुळं ही कारवाई करण्यात आल्याचं विभाग नियंत्रक डी. सी. बेलसरे यांनी सांगितले. राज्य परिवहन महामंडळाचं रोज नुकसान होत आहे. बसअभावी प्रवासासाठी प्रवाशांचे हाल सुरू आहेत. नागपूर विभागातील 129 वर चालक, वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीही काही कर्मचारी संपावर ठामच आहेत. 8 नोव्हेंबरपूर्वीपासून विभागातील एसटीच्या 100 टक्के फेर्या बंद आहेत. महामंडळाच्या नागपूर विभागात रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्यांनाही कामावर येण्यापासून रोखण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे.
रत्नागिरीत 86 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बस वाहतूक ठप्प असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने आजापर्यंत रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 86 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. 24 तासांच्या आत कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र तरी देखील कर्मचारी कामावर हाजर न झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या 86 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 4 हजार 339 इतकी आहे. त्यापैकी 249 कर्मचारी राज्य परिवहन महामंडळात रोजंदारीवर काम करतात. इशारा देऊन देखील कर्तव्यावर हजर न झाल्याने यातील 86 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (so far a total 2937 ST employees have been suspended)
संबंधित बातम्या
महाधिवक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना पुन्हा आवाहन