मुंबईः आपण जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडी कार्यालयाला भेट देणार आहोत, असा इशारा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गुरुवारी दिला आहे. शिवाय संजय राऊतांनी (Sanjay Raut) सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करून 58 कोटी रुपये हडपल्याचा आरोप केला आहे. याचाही त्यांनी समचार घेत राऊतांनी आरोप करण्यापेक्षा याप्रकरणाचा एक जरी कागद असला, तरी द्यावा असे आव्हान दिले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप आता टोकाला पोहचले आहेत. संजय राऊतांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्याने हे प्रकरण पुन्हा ताणले गेले आहे. राऊतांवरील कारवाई अन्यायकारक आहे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. त्यानंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करून 58 कोटी रुपये हडपल्याचा आरोप केला होता. राऊतांनी याप्रकरणी एक तरी कागद द्यावा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. त्यांच्याकडे जी माहिती आहे, ती जनतेसमोर ठेवावी. पोलीस तक्रारीची कॉपी देण्यास नकार देतायत. मात्र, पोलिसांच्या चौकशीचे स्वागत आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी. कागदोपत्री त्यांच्याकडे काहीही पुरावा नाही, असा दावाही सोमय्यांनी आज बोलताना केला.
किरीट सोमय्या यांनी आता वादग्रस्त अशा जरंडेश्वर कारखान्याचे प्रकरण हाती घेतले आहे. याबाबत आपण ईडी कार्यालयाला भेट देणार आहोत, असा इशाराच त्यांनी दिला आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव इथे आहे. या कारखान्याची जमीन तब्बल 214 एकर इतकी आहे. केवळ जमीनच नाही तर कारखान्याची टोलेजंग इमारत आहे. जर कारखाना आहे म्हटल्यावर त्यात मशिनरी असणारच, शिवाय कारखान्याची वाहने-गाड्या, संचालकांचे बंगले, अशी सर्व मालमत्ता कितीची असू शकते? तर एव्हढा सगळा पसारा असूनही या मालमत्तेचा लिलाव केवळ 40 कोटी रुपयांना झालाय. ईडीच्या तपासात या कारखान्याच्या खरेदीचे धागेदोरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहचलेत. याप्रकरणी पूर्वीही बरेच आरोप-प्रत्यारोप झालेत. आता सोमय्या नेमकी काय मागणी करणार, याची उत्सुकताय.