शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार? पडद्यामागे मोठ्या घड्यामोडींची चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडतील याचा काहीच अंदाज नाही. नुकतंच अजित पवार यांनी उपुमख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने संपूर्ण राज्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. असं असताना आता काँग्रेसबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडून आला. विरोधात असलेले अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण अजित पवार यांनी उचलेलं हे पाऊल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पटलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्या गटाचा आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आलाय. या घटनेनंतर आता एकाच पक्षाच्या दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
असं असताना आता भाजपच्या गोटातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता भाजपचं पुढचं ध्येय हे महाराष्ट्र काँग्रेस असण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील भलामोठा आमदारांचा गट हा सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासाठी काँग्रेसचे दोन दिग्गज नेते हे भाजपच्या संपर्कात आहेत. तसेच याबाबतची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली आहे, अशीदेखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य
विशेष म्हणजे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि अन्य पक्षाचे इतर नेते हे पक्ष बदलण्याच्या तयारी आहेत. “फक्त भाजपचं नाही तर असे अनेक जण आहेत जे आपल्या पक्षात खूश नाहीत. कारण त्यांचे नेते स्वार्थी आहेत. ते देशाच्या विकासात बाधा निर्माण करत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल रोष आहे”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्यांकडून चर्चांचं खंडन
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी याबाबतच्या चर्चांचं खंडन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार सत्तेत दाखल झाल्यानंतर आता काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याच्या बेतात आहे. या दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच एका मुलाखतीत दावा केला होता की, भाजपने याआधीदेखील काँग्रेस पक्षाला फोडण्याचा प्रयत्न केलाय. दोन तृतीयांश संख्या म्हणजे 30 आमदार होतात. त्यामुळे पक्ष फोडणं इतकं सोपं नाही. कदाचित एखाद-दुसरा भाजपात जाऊ शकतो, असं ते मागे म्हणाले होते.
काँग्रेस पक्ष सावध
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस पक्षही सावध झाला आहे. रविवारी अजित पवार यांची शपथविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर काँग्रेस पक्षाने मंगळवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्ही मजबूत, एकजूट आणि महाविकास आघाडीत आहोत, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही काँग्रेस फुटीच्या चर्चा
एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनेत बंड पुकारलं होतं. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गुवाहाटी येथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर ते गोव्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या आमदारांचा भलामोठा गट हा भाजपमध्ये सामील होणार असल्याची बातमी समोर आली होती. पण तसं काही घडलं नव्हतं.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा
विशेष म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. पण त्यांनी त्या चर्चांचं खंडन केलं होतं. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या शपथविधीच्या दोन दिवस आधी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर अशोक चव्हाण गेले होते. त्यावेळी पवार आणि चव्हाण या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती त्यांनी दिली होती.