महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला, सूत्रांकडून मोठी बातमी
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. जागावाटपाबाबत काल मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबई | 17 मार्च 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या जागावाटपात शिवसेना ठाकरे गट हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. कारण ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’कडे याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या आज ठरलेल्या फॉर्म्युल्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाही. पण तरीदेखील वंचितसाठी 4 जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीचा 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे केंद्रीय नेते आज मुंबईत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज संध्याकाळी शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेतून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेआधी काल मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
वंचितचं काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट 23 जागांवर ठाम होता. संजय राऊत यांनी वारंवार याबाबत भूमिका मांडली होती. पण आता ठाकरे गटाला 22 जागा देण्याचा निर्णय बैठकीत झालाय. विशेष म्हणजे आपल्याकडे असलेल्या जागांपैकी हातकणंगले जागेवर ठाकरे गट राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. शिवसेनेचे ते पुरस्कृत उमेदवार असतील, अशी माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीने वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. हा प्रस्ताव अजूनही कायम आहे. मविआ आता वंचितची दोन ते तीन दिवस वाट पाहणार आहे. वंचितकडून काय सकारात्मक प्रतिक्रिया येते याकडे महाविकास आघाडीचं लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या मुंबईतील आजच्या सभेचं निमंत्रण वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं आहे.
रामटेकची जागा काँग्रेसला
काँग्रेस सांगलीच्या जागेसाठी आग्रही होती. कोल्हापूर आणि सांगली जागांसाठी पेच निर्माण झालेला होता. काँग्रेसला छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीसाठी कोल्हापूरची जागा हवी होती. तसेच काँग्रेसला सांगली ही सुद्धा जागा हवी होती. दुसरीकडे ठाकरे गटाचादेखील या जागेवर दावा होता. अखेर कालच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला. ठाकरे गटाकडे असलेली रामटेक जागा ही काँग्रेसला दिली जात आहे आणि सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडण्यात आली आहे. महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्यासाठी ठाकरे गटाने सांगली जागा घेतली आहे. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.
ठाकरे गटाला मिळालेल्या जागांची यादी
- रत्नागिरी
- रायगड
- ठाणे
- कल्याण
- पालघर
- नाशिक
- शिर्डी
- जळगाव
- मावळ
- धाराशिव
- परभणी
- छत्रपती संभाजीनगर
- बुलढाणा
- हिंगोली
- यवतमाळ
- हातकणंगले (पाठिंबा)
- सांगली
- दक्षिण मुंबई
- दक्षिण मध्य मुंबई
- मुंबई उत्तर पश्चिम
- मुंबई उत्तर
- ईशान्य मुंबई
शरद पवार गटाला कोणत्या जागा मिळाल्या?
- बारामती
- शिरुर
- बीड
- दिंडोरी
- रावेर
- अहमदनगर
- माढा
- सातारा
- वर्धा
- भिवंडी
काँग्रेसला कोणत्या जागा मिळाल्या?
- नागपूर
- भंडारा-गोंदिया
- चंद्रपूर
- गडचिरोली
- रामटेक
- अमरावती
- अकोला
- लातूर
- नांदेड
- जालना
- धुळे
- नंदुरबार
- पुणे
- सोलापूर
- कोल्हापूर
- उत्तर मध्य मुंबई