सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या कारखान्यांसाठी तिजोरी उघडली, पण पंकजा मुंडे यांना धक्का
Sugar Factory | पंकजा मुंडे यांच्या कारखान्यांसमोर संकटे असताना त्यांना मदत मिळत नाही. आता राज्य सहकारी बँकेने सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांसाठी तिजोरी उघडली आहे. परंतु त्यात पंकजा मुंडे यांचा कारखाना नाही.
मुंबई | दि. 29 फेब्रुवारी 2024 : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर संकटांची मालिका संपत नाही. काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस दिली होती. 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्या प्रकरणात ही नोटीस होती. त्यानंतर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) थकवला. ही रक्कम न भरल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली होती. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यांसमोर संकटे असताना त्यांना मदत मिळत नाही. आता राज्य सहकारी बँकेने सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांसाठी तिजोरी उघडली आहे. परंतु त्यात पंकजा मुंडे यांचा कारखाना नाही. यामुळे भाजप नेत्यांची पंकजा मुंडेवरील नाराजी काय असल्याचे संकेत जात आहेत.
खासदारकीनंतर अशोक चव्हाण यांना दुसरे गिफ्ट
सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान असल्याचे दिसत आहे. कारण राज्य सहकारी बँकेने अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित प्रशांत काटे यांच्या कारखान्याला मदत केली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला मदत केलेली नाही. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेत पाठवले होते. आता त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याला थकहमी पोटी १४७.७९ कोटी रुपयांची मदत केली. काँग्रेसमध्ये असलेले आणि भाजपला सातत्याने मदत करणारे धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्याला 59.49 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
यांनाही दिली मदत
- सोलापूरमधील पडसाळी येथील धनाजीराव साठे यांच्या संत कुरुमदास सहकारी कारखाना या कारखान्यास ५९.४९ कोटींची मदत
- पंढरपूरमधील भाळवणी येथील कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्यास १४६.३२ कोटींची मदत
- बीडमधील गेवराई येथील अमरसिंह पंडित यांचा जय भवानी सहकारी साखर कारखान्यास १५० कोटींची मदत दिली आहे.
- प्रशांत काटे यांच्या इंदापूरमधील छत्रपती सहकारी साखर कारखान्यास १२८ कोटींची मदत देण्यात आली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माळशिरस येथील शंकर सहकारी साखर कारखान्यास ११३.४२ कोटींची मदत दिली आहे.
- हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूरमधील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्यास १५० कोटी रुपयांची मदत दिली गेली आहे.
- हर्षवर्धन पाटील यांचा आणखी एक कारखाना आहे. निरा भिमा सहकारी साखर कारखान्या शहाजी नगरला ७५ कोटी रुपये दिले गेले आहेत.
- भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या लातूरमधील शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारीला ५० कोटी रुपयांची मदत दिला आहे.
- केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांच्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्यास ३४.७४ कोटी रुपये दिले आहेत.
- धनंजय महाडीक यांचा सोलपूरमधील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यास १२६.३८ कोटी रुपये दिले आहे.