Eknath Shinde : ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घर देणारा “क्लस्टर” डेव्हलपमेंट प्रकल्प माझं स्वप्न : एकनाथ शिंदे
वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणा असलेली सिडको आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात यापूर्वीच सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. लवकर या प्रकल्पाला गती मिळणार असून ही ठाण्यासाठी एक अभिमानाची बाब आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
ठाणे : शहरातील धोकादायक, अति धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देण्याचं माझं स्वप्न असून अत्यंत जिव्हाळ्याच्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट (Cluster Development Project) प्रकल्पाच्या माध्यमातून ते पूर्ण होताना समाधान वाटत असल्याची भावना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने लोकमान्य नगर, कोरस रोडवरील सुविधा भूखंडावर शहरातील समूह विकास योजनेंतर्गत संक्रमण शिबीर इमारत बांधकामाच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र पाठक, उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Statement of Urban Development Minister Eknath Shinde on Cluster Development Project)
महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेचा महत्त्वाचा टप्पा पार
शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देणाऱ्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेने मंगळवारी महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणा असलेली सिडको आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात यापूर्वीच सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. लवकर या प्रकल्पाला गती मिळणार असून ही ठाण्यासाठी एक अभिमानाची बाब आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
पहिल्या टप्प्यात किसननगर येथील क्लस्टर योजनेला सुरुवात होणार
ठाण्यातील धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांना त्यांच्या हक्काचे व सुरक्षित घर मिळावे यासाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लढा सुरु होता. या लढ्यातूनच हा भव्य प्रकल्प साकारत आहे. नगरविकास विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर लगेचच या महत्त्वपूर्ण योजनेतील त्रुटी दूर करून योजनेला गती देण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात किसननगर येथील क्लस्टर योजनेला सुरुवात होणार असल्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
प्रत्येक नागरिकास न्याय देणार
ठाणे शहरात एकूण 1500 हेक्टरहून अधिक जमिनीवर क्लस्टर योजना साकारत असून यात नागरिकांना स्वमालकीची, सुरक्षित घरे मिळण्याबरोबरच रुंद रस्ते, उद्याने, मैदाने, मूलभूत सोयीसुविधा, रोजगार केंद्रे,अर्बन फॉरेस्ट आदी वैशिष्ट्ये असणार आहेत. शहरातील धोकादायक अति धोकादायक इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास न्याय देण्याचे काम करण्यात येणार असून अनेक वर्षांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. (Statement of Urban Development Minister Eknath Shinde on Cluster Development Project)
इतर बातम्या