मुंबईकरांनो चौपाटीवर जाताय? सावध… समुद्रात पुन्हा त्यांचा वावर सुरू; पाण्यात पाय टाकताच…
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.
मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण चौपट्यांवर जात असतात. चौपाट्यांवर जाऊन गरमागरम भजी, पाणीपुरी किंवा खमंग भाजलेलं कणीस खात पावसाचा आनंद लुटला जातो. काही तरुण तर समुद्रात जाऊन पावसाचा आनंद लुटत असतात. पण आता चौपाटीवर जाणार असाल थोडं सावध राहा. कारण ब्लु बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा वावर समुद्रात सुरू झाला आहे. त्यांच्याकडून दंश होऊ शकत असल्याने नागरिकांनी चौपट्यांवर जाताना सावधानता बाळगावी असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. महापालिकेने पत्रक काढून हे आवाहन केलं आहे.
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्लु बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. दरवर्षी या जेलीफीश आणि स्टिंग रेकडून दंश झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांना इजा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुहू चौपाटीला भेट दिली. त्यानंतर नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करावा, अशी विनंती महापालिकेला केली. महापालिकेनेही त्याची गंभीर दखल घेत नागरिकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे.
काय काळजी घ्याल?
समुद्रात गेल्यावर काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती मुंबई महापालिकेने नागरिकांना दिली आहे. समुद्रामध्ये जाताना उघड्या अंगाने जावू नये, तसेच पाण्यामध्ये जावयाचे झाल्यास ‘गमबुट’ वापरावेत आणि लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन महापालिकेने केले आहे. माशांनी दंश केल्यावर घाबरू नका, तात्काळ महापालिका आरोग्य सेवेच्या केंद्रात त्वरित संपर्क साधा. चौपाट्यांवर महापालिकेतर्फे लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहनही पालिकेने केलं आहे.
मुंबईकरांनी समुद्रात जाऊ नये म्हणून महापालिकेने उपाय करण्याच्या सूचना देण्यात दिल्या आहेत. त्यानुसार समुद्रांवर असणाऱ्या वॉच टॉवरवरून नागरिकांना मेगाफोनवरून सूचना देणे, लोकांनी समुद्रात जाऊ नये, अशा आशयाचे फलक लावणे, तसेच चौपाटीवर फिरताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करणे अशा प्रकारच्या उपाययोजना पालिकेकडून केल्या जात आहेत.
आग किंवा चटका लागल्याचा अनुभव
स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी दिली.
प्रथमोपचार
जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका
जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या
मस्त्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढा
जखम झालेल्या जागी बर्फ लावावा