वडापाव खायलाही पैसे नसायचे, टॉयलेट साफ केले, पण आज शिक्षणासाठी लंडन गाठलं
आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. फक्त जिद्द सोडायची नाही. आपल्यावर कोणतंही संकट येऊ द्या, कितीही अडचणीचा प्रसंग येऊ द्या. आपण जिद्द सोडली नाही तर आपल्याला हवं असणारं यश आणि मार्ग मिळवण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. 27 वर्षाच्या राजेश्वरीचा प्रवास आपल्याला हेच शिकवतोय.
मुंबई : स्वप्न म्हणजे काय असतं? हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात स्वप्न पाहत असतो. कुणाला IPS अधिकारी बनायचं असतं, कुणाला डॉक्टर, तर कुणाला इंजीनिअर व्हायचं असतं. विशेष म्हणजे अनेकजण प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे स्वप्न वास्तव्यातही साकार करतात. आम्ही अशाच एका जिद्दी तरुणीची कहाणी आपल्याला सांगणार आहोत. या तरुणीला आज मिळालेलं यश सोपं नव्हतं. खरंतर संघर्षाच्या या प्रवासात जिथपर्यंत ती पोहोचलीय तिथपर्यंत येण्यापर्यंत तिला किती खस्ता खाव्या लागल्या हे शब्दांत सांगणं खूप कठीण आहे. कारण तो संघर्षच तितका मोठा आहे.
आम्ही ज्या तरुणीविषयी बोलतोय त्या तरुणीचं नाव राजेश्वरी मच्छेंदर असं आहे. ती 27 वर्षांची आहे. तिची कहाणी खरंच प्रेरणादायी आहे. कारण ती एकेकाळी मुंबईच्या झोपडपट्टी भागात राहायची. तिचे आई-वडील बिगारी कामगार होते. ते कन्स्ट्रक्शन साईटवर विटा, रेती उलण्याची कामे करायचे. या कामातच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. ते ज्या झोपडीत राहायचे तिथली देखील वेगळी कहाणी आहे. पण अशा परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. विशेष म्हणजे अनेकदा या कुटुंबाला कधीकधी अन्नदेखील मिळायचं नाही. साधा वडापाव खाण्या इतपतही त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण तशा परिस्थितीतही त्यांनी दिवस काढले.
एकवेळ जेवण मिळणं कठीण होतं
राजेश्वरी हिचा जन्म तेलंगणा इथे झाला होता. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तिचे आजोबा, आई-वडील आणि इतर कुटुंबीय मुंबईत दाखल झाले. ते एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करु लागले. ते घमेल्यामध्ये विटा आणि रेती भरुन वाहण्याचं काम करायचे. राजेश्वरीच्या आई-वडिलांनी अनेक वर्ष हे काम केलं. घरात अठराविश्व दारिद्र्यामुळे एकवेळचं जेवण मिळणं कठीण होऊन बसलं होतं. पण तशा परिस्थितीत या कुटुंबाने दिवस काढले.
गावातही शिक्षण केलं
राजेश्वरी हिची मूळ भाषा कन्नड आहे. त्यामुळे तिने कन्नड भाषेत शिक्षण करावं, अशा तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण मुंबईत त्यांना कन्नड शाळा मिळाली नाही. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेत तिने शिक्षण पूर्ण केलं. या दरम्यान ती प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊ लागली तेव्हा तिच्या वडिलांनी आपली मुलगी मोठी झाली म्हणून शहरात न ठेवता गावी पाठवावं, या विचाराने तिला गावी पाठवलं. राजेश्वरीचं गावात असलेल्या शाळेत शिक्षण सुरु झालं. ती तिच्या आजीसोबत तिथे राहायची. पण आजीच्या निधनानंतर तिला पुन्हा मुंबईत यावं लागलं. तिने बारावी नंतर कॉल सेंटर आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. शिक्षण आणि पार्टटाईम काम करत पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने अनेक ठिकाणी जॉब केला.
…आणि शिक्षणसाठी लंडन गाठलं
या दरम्यान तिने खूप अभ्यास केला. तिने इंग्लंडमधील विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तिच्या प्रयत्नांना यश आलं. ती पदवी शिक्षणानंतर तब्ब्ल पाच वर्षांनी लंडनला पुढील शिक्षणासाठी गेली. संबंधित विद्यापीठाच्या पूर्व परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. तिला शिष्यवृत्ती मिळाली. पण तितके पैसे पुरेसे नव्हते. त्यामुळे तिने बँकेकडून लोन घेतलं. ती इंग्लंडमध्ये शिक्षणासोबत जॉब करुन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवते.