ट्रक चालकाच्या संपात फूट, राज्यातील काही भागांत संप मागे, काही ठिकाणी सुरु
petrol diesel company truck drivers strike | राज्यातील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप सोमवारपासून सुरु केला आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत संप मागे घेण्यात आला आहे. विदर्भ आणि कोल्हापूरमधील संप मागे घेतला गेला आहे.
मुंबई दि. 2 जानेवारी 2024 | राज्यातील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचवेळी संपामध्ये फूट पडली आहे. राज्यात विदर्भ आणि कोल्हापूरमधील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. परंतु राज्यातील इतर ठिकाणी संप सुरुच आहे. केंद्र सरकारकडून नवीन मोटार वाहन कायदा आणला जात आहे. या कायद्यास देशभरातील ट्रक चालकांनी विरोध करत एक जानेवारीपासून संप सुरु केला आहे. पहिल्या दिवशी राज्यातील ट्रकचालकही सहभागी झाले होते.
कोल्हापूरमध्ये संप मागे
कोल्हापूरमधील वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पुकारलेला संप रात्री उशिरा मागे घेतला आहे. या संपामुळे काल रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर लागल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा आवश्यक साठा आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, असे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
विदर्भातील संप मागे
सरकारशी चर्चा केल्यानंतर विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. नागपूर आणि विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. रस्त्यांवर वाहतूक सुरुळीत सुरु झाली आहे. ट्रक चालक संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही झाला आहे. दुसरीकडे अमरावतीमध्ये पेट्रोल पंपावर पहाटे पासूनच वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका, स्कूल बस तसेच सर्वसामान्यांवर फटका बसला आहे.
पुणे शहरात संप सुरुच
पुणे शहरात ट्रक चालकांनी संप कायम ठेवला आहे. सोलापुरात पेट्रोल पंपावर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेने नागरिकांनी काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत.
पेट्रोल डिझेल नाहीचे लागले फलक
ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाचा पेट्रोल डिझेलला फटका बसला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्वच पेट्रोल पंपावर आज सकाळीपासूनच पेट्रोल डिझेल नाही, असे फलक लावले आहेत. सोमवारी दिवसभरात पेट्रोल डिझेलचे टँकर आले नसल्याने, पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल मिळत नसल्याने ट्रक, टेम्पो पंपावर लावण्यात आले आहेत.
मनमाडमध्ये वाहतूक ठप्प, धारशिवमध्ये साठा शिल्लक ठेवणार
मनमाडच्या पानेवाडीत येथील पेट्रोल, डिझेल वाहतूक ठप्प झाली आहे. मनमानडमध्ये पुरवठा कंपनीची चालक आपल्या संपावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत गाड्या काढणार नसल्यावर चालकाचे एकमत आहे. धाराशिवमध्ये सकाळपासून पेट्रोल डिझेल पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्या आहेत. नागरिक गाडी प्रमाणे बाटलीत तसेच कॅनमध्ये पेट्रोल भरून साठा करत आहेत. आपत्तकालीन सेवा आणि रुग्णवाहिका पोलिस यासाठी साठा राखीव असणार आहे.