मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रात दोन पक्षांमध्ये उभी फूट पडलीय. शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलीय. त्यानंतर भाजप नेत्यांकडून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल, असा दावा केला जातोय. पण खुद्द सत्ताधारी भाजपमध्येच सारं काही आलबेल आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपमध्ये बीडच्या डॅशिंग महिला नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होते, तर कधी विनोद तावडे यांना पक्षात बाजूला डावलेल्याची चर्चा होते. विनोद तावडे यांना पक्षाकडून राष्ट्रीय पातळीवर पक्षबांधणीचं काम देण्यात आलेलं आहे. पंकजा यांनाही पक्षाच्या केंद्रीय समितीवर स्थान देण्यात आलेलं आहे. तर गेल्या निवडणुकीत ज्यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं त्या चंद्रशेखर बावनकुळेंना पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांनाही पक्षाकडून उमेदवारीचं तिकीट नाकारण्यात आलं होतं. तसेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पंकजा यांना पक्षाकडून संधी देण्यात आली नव्हती. या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्र भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा वारंवार होत असते. आतादेखील तशाच चर्चांना खतपाणी घालणारं वृत्त समोर आलं आहे.
भाजपच्या विभागवार बैठकीचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. भाजपच्या मुंबईतील बैठकीला सर्व विभागनिहाय सदस्य उपस्थित आहेत. पण विदर्भातील वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या बैठकीचं निमंत्रणच नाहीय.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईत विभागवार बैठका पार पडत आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून विभागवार बैठका सुरु आहेत. या बैठकांमध्ये प्रत्येक विभागाचा आढावा घेतला जातोय. विदर्भ विभागाची सुद्धा बैठक पार पडली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आमदाराशी चर्चा करत विभागांची माहिती घेतलीय. याच बैठकीला विदर्भातील भाजपचा बडा नेता आणि राज्य सरकारमधील मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांची गैरहजेरी बघायला मिळाली.
सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही याबाबात प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, अशी माहिती दिली आहे. आजच्या बैठकीची मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत सातत्याने चर्चा सुरु असते. मध्यंतरी ते राज्यात राहणार की दिल्लीत जाणार? याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर आजच्या बैठकीत ते गैरहजर राहिलेले बघायला मिळाले.