राज्यात ‘मॅडम राज’, मुख्य सचिवपदी पहिली महिला, कोण आहेत सुजाता सौनिक?
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी पहिल्यांदाच एका महिला आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांची पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या महिला मुख्य सचिव पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे राज्यात आता 'मॅडम राज' चालणार आहे.
महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्यांदाच महिला अधिकारीची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकापदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली होती. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या. यानंर आता राज्याच्या मुख्य सचिवपदी देखील सरकारने महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिव पदी आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक या 1987 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागणार असल्याची दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. त्यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. यापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिवपदी कार्यभार सांभाळलेला होता. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे सेनानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता सुजाता सौनिक यांची वर्णी लागली आहे. सुजाता सौनिक या जून 2025 पर्यंत राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
सुजाता सौनिक यांच्याऐवजी महसूल विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमारी (१९८७ बॅच) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल (१९८९ बॅच) यांच्यादेखील नावांची जोरदार चर्चा सुरु होती. पण अखेर सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी वर्णी लागली आहे. शिंदे सरकारने सुजाता सौनिक यांची निवड करुन राज्याला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिल्याचीदेखील चर्चा आता होत आहे. विशेष म्हणजे राज्यात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीआधी राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणादेखील केल्या आहेत.
सुजाता सौनिक कोण आहेत?
सुजाता सौनिक या डॅशिंग आणि कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याकडे सध्या राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार आहे. त्यांना नुकतीच सचिव पदावर बढती मिळाली होती. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. सार्वजनिक आरोग्यासह अन्य काही विभागातही त्यांनी काम केलं आहे.
सुजाता सौनिक यांना प्रशासकीय सेवेत काम करण्याचा तीन दशकांपासूनचा अनुभव आहे. त्यांना आरोग्य सेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. सुजाता यांचे पती मनोज सौनिक हे देखील राज्याचे मुख्य सचिव होते. यानंतर त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून करण्यात आली होती.
मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर सरकारने 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी नितीन करीर यांची मुख्य सचिवपदासाठी नियुक्ती केली होती. गेल्यावर्षी 31 डिसेंबरला नियुक्त झालेले करीर या वर्षी मार्चमध्ये निवृत्त होणार होते. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर आता मनौज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली.