येत्या 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागल्यावर अजितदादांच्या गटात मोठं बंड होणार आहे. अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांना घेऊन बंड करणार आहेत. ते भाजपमध्ये जाणार आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे. मेहबूब शेख यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करत असून पक्षात प्रवेश करू इच्छित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
आमच्या पक्षात ज्याचं सिल्वर ओकवर प्रेम आहे, तेच लोक इथे राहिली आहेत. जे इकडं तिकडं पळणारे होते, दुसऱ्यांच्या घरात डोकावणारे होते ते सर्व निघून गेले. आमच्या पक्षातून कोणी आता फुटणार नाही. सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या पक्षाचे बरेच आमदार 4 जून नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत. अनेकांचे निरोप आमच्याकडे येत आहेत. त्यांना आमच्या पक्षात यायचं आहे. 4 जून नंतर सुनील तटकरे हे काही आमदारांसोबत डायरेक्ट भाजपमध्ये जाणार आहेत. कारण त्यांना शरद पवार यांच्याकडे एन्ट्री मिळणार नाही. त्यामुळे तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे, असा दावा मेहबूब शेख यांनी केला आहे.
आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा पक्षातील आमदार शरद पवार यांच्याकडे जाऊ नये म्हणून त्यांना ते भाजपमध्ये न्यायचे आहेत. त्यामुळे गोंधळ निर्माण करणारी विधानं ते करत आहेत. पक्षाला सावरण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बैठकीतही ते दिसून आलं. गरवारे क्लबमधील त्यांची भाषणं बघितली तर अजित पवार यांचा गट पूर्ण पराभूत मानसिकतेत गेल्याचं दिसतं. अजित पवार यांची नैया बुडायला लागली म्हणून तटकरे आता भाजपकडे जाणार आहेत. त्यांच्या नौकेत सामील होणार आहेत, असा दावा मेहबूब शेख यांनी केला.
सुनील तटकरे हे 100 टक्के भाजपामध्ये जाणार आहेत. 4 जून नंतर बैल पोळा सारखेच त्यांचे सगळे आमदार बाहेर निघणार आहेत. कोणाचं ऐकणार हे त्यांना कळलं आहे म्हणून ते काहीही स्टेटमेंट देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तटकरे साहेबांनी आपल्या पक्षात भुजबळ काय बोलत आहेत किंवा इतर लोक काय बोलतात यावर लक्ष ठेवावं. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मतदारसंघात 100 ते 150 कोटी खर्च करून देखील त्यांना काही यश मिळत नाही म्हणून काही लोकांना घेऊन ते जर भाजपात जाणार आहेत. भाजपमध्ये गेल्यावर काही मिळेल असं त्यांना वाटत आहे, असा दावाही त्यांनी केला.