प्रिय नीतू, बाळा… तुझ्या वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना नेता कसे…; सुषमा अंधारे यांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल
हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तुझ्या वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या नेत्याचे तू कसे काय नेतृत्व स्वीकारले? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मुंबई: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणारा एक व्हिडीओ भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केला. त्यावर सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? असा सवालही नितेश राणे यांनी केला. बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांना शिवबंधन बांधलेच कसे? असा सवालही राणे यांनी केला. त्यामुळे सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील भाषण करतानाच जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात फडणवीस नारायण राणे यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना दिसत आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी तुझ्या वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय मानलेस? असा सवालच नितेश राणे यांना केला आहे.
नितेश राणे आणि सुषमा अंधारे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. दोघेही एकमेकांच्या आधीच्या भूमिकांचे व्हिडीओ शेअर करून एकमेकांची पोलखोल करत आहेत.
नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करणारा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांची पोलखोल करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे विधानसभेत फडणवीस ही पोलखोल करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तुझ्या वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या नेत्याचे तू कसे काय नेतृत्व स्वीकारले? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
या शिवाय सुषमा अंधारे यांनी या व्हिडीओवर एक पोस्टही लिहिली असून त्यातून त्यांनी नितेश राणे यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी…
प्रिय नीतू बाळा,
तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्कची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरापट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास.
पण पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल 2015 सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस? किंवा गानसम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही.
मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे. भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या बाबांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच.
तुझी आत्या
नितेश राणेंची पोस्ट काय होती?
हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन? अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?
हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन? अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? pic.twitter.com/gqShJyGYjv
— nitesh rane (@NiteshNRane) November 27, 2022