स्लीपर सेलमधले गद्दार आणि शाऊटींग ब्रिगेड… संजय राऊत यांना शुभेच्छा देताना सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सकाळपासूनच राऊत यांचा फोन खणखणत असून लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. तर अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही एक पोस्ट लिहून राऊत यांना शुभेच्छा दिल्या असून अंधारे यांची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भांडूप येथील निवासस्थानी राऊत यांच्या समर्थकांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच दैनिक सामनाच्या कार्यालयात येऊनही त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, या सर्वांमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेल्या शुभेच्छा हटके आहेत. सुषमा अंधारे या राऊत यांना भाऊ मानतात. त्यांनी खास पोस्ट लिहून राऊत यांना शुभेच्छा देताना त्यांना शिवसेनेची चिलखत अशी उपमा दिली आहे. तसेच या शुभेच्छा संदेशात त्यांनी राऊत यांच्या संघर्षाचा आढावा घेतानाच त्यांच्या लढाऊ वृत्तीचं कौतुकही केलं आहे.
सुषमा अंधारे यांचं पत्र जसंच्या तसं…
सन्माननीय संजय राऊत सर
शिवसेनेची चिलखत….
आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकांसाठी “निष्ठा”दिवस आहे… !!
लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जीवाच्या आकांताने लढतो. त्याची लढाई येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता आणि आशंका मांडते. ही समष्टीची लढाई म्हणजे हुकूमशाही विरोधातला विद्रोह जणू. पण ज्यांना हा विद्रोह कळत नाही, जे समजुन उमजून सोयीस्कररित्या आपला स्वार्थ साधण्यासाठी मौन बाळगतात. अशांसाठी कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ दादा जे बिरूद वापरतात ते योग्यच. पण सत्तेसाठी जी हुजुरी करणारे, प्रसंगी आपल्या पाठीला रबर नाही कणा आहे हे विसरणारे मात्र मग थयथयाट करतात. जसा गद्दारांवर आपण केलेल्या हल्ल्यानंतर काल काहींनी थयथयाट केला.
सर, माझ्यासाठी आपण कायम कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती. सगळ्यांना सांभाळून घेणारा मोठा भाऊ असे वाटत राहिलात. पक्षप्रवेशनांतर आपल्याला भेटायचे तोच सूड भावनेतून झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे आपल्याला भेटता आले नाही. आपल्या गैरहजेरीत माझ्या परीने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. पण आपला अत्यंत लढाऊ आणि कर्तबगार असा मोठा भाऊ काही काळासाठी सोबत नाही ही उणीव आम्हाला अधिक जबाबदारीने वागण्याचे भान देत होती. सामनाच्या संपादकीय मधला रोखठोक बाणा आपल्या वागण्या जगण्यातही आहे. हे आपले टीकाकार ही अमान्य करणार नाहीत.
सर, ज्यांना बहीण-भाऊ किंवा बाप-लेक अशी नातीच ज्ञात नाहीत किंवा त्यांच्या घरात तसे संस्कारच शिकवले नाहीत असे तद्दन बौद्धिक दिवाळखोर जेव्हा त्यांच्या कुटुंब, संघटना तथा नेतृत्वाच्या संस्काराचा विकृत परिचय देतात. अधूनमधून जेव्हा ट्रोलिंग, दबावतंत्र यामुळे माझे कुटुंबीय अस्वस्थ होते तेव्हा आम्ही आपला, आपल्या कुटुंबाचा त्यांनी मधल्या काळात जे दिव्य सोसलं त्याचा विचार करतो अन् मग कळतं, अरेच्य्या वर्षा वहिनी किंवा तुमच्या आईंनी जे सोसलं त्यापुढे हे काहीच नाही.
मध्ये नीलम गोऱ्हे आपली उपसभापती पदाची खूर्ची वाचवण्यासाठी गद्दारी करुन गेल्या. पण आपल्या गद्दारीचे लंगडे समर्थन करताना. मला राऊतांचे बोलणे पटत नव्हते असे सांगितले. तेव्हा मात्र निष्ठावान शिवसैनिकांनी गोऱ्हे नावाचा शेवटचा बेईमान चिरा निखळला म्हणून आनंदच व्यक्त केला हे उल्लेखनीय आहे.
सर, ज्या त्वेषाने आपण गद्दार गँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दांभिकतेवर तुटून पडताय जीवाच्या आकांताने हा मातोश्रींचा गढ वाचवण्यासाठी निकराची झुंज देत आहात ती केवळ अतुलनीय आहे. लावारिस पेड ट्रोलअर्स, स्लीपर सेलमधले गद्दार, एवढं धमकावूनही हा बधत कसा नाही हा विचार करुन हार मानणारी शाऊटींग ब्रिगेड, अन् मातोश्रीने भरभरून दिल्यावरही बेईमान होणारे स्वार्थी नेते या सगळ्यांना आपण तोंड देत आहात. आपला ऊर्जास्व लढा फलद्रूप होवो या सदिच्छासह पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
आपली लहान बहीण
सुषमा अंधारे