दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : वांद्र्यातील एमएमआरडीएच्या कार्यालयात संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. एमएमआरडीएच्या कार्यालयात संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर संशयास्पद वस्तू आढळली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं. या पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांकडून युद्ध पातळीवर तपास सुरु झाला. या दरम्यान एमएमआरडीए परिसरात बॉम्ब असल्याची अफवा पसरली.
एमएमआरडीच्या कर्मचाऱ्यांना इमारतीच्या पार्किंगमध्ये काही संशयास्पद वस्तू आढल्या. त्यानंतर कर्मचारी तातडीने कार्यालयाच्या बाहेर आले. कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर लगेच स्थानिक बीकेसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही संशयास्पद नेमकी काय आहे, याची तपासणी करण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं.
संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर तातडीने संबंधित इमारत खाली करण्यात आली. एमएमआरडीएच्या अनेक कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव घरी पाठवण्यात आलं. या दरम्यान बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तपास केला असता कोणताही बॉम्ब किंवा घातक वस्तू आढळल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिसला मिळाला.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वांद्रे कुर्ला संकुलातील एका कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. ते इंटरनॅशनल ऑलम्पिक समितीच्या बैठकीसाठी येक आहेत. त्यांचा उद्या दौरा असताना आज अचानक अशाप्रकारची बातमी समोर आल्याने परिसरात चर्चांना उधाण आलं होतं. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पोलिसांकडून नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जात आहे. वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत होते. असं असताना अचानक संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती समोर आली आणि खळबळ उडाली. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून सुरक्षेची पूर्ण तयारी केली जात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी सुरक्षेत कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.