यंदा पाऊसपाणी चांगला होऊ दे, शेतशिवारात, घराघरात समृद्धी येऊ दे, जगावरचं कोरोनाचं संकट दूर कर, अजितदादांचं पांडुरंगाचरणी साकडं
आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊदे. त्यांच्या शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे. बा पांडुरंगा, जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव”, असं साकडंही उपमुख्यमंत्र्यांनी बा पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी घातलं आहे. (Take away world’s corona crisis, Ajit Pawar prayer to Vitthal of Pandharpur)
आषाढी एकादशीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची संतपरंपरा, पांडुरंगभक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकरी माऊलींनाही वंदन केलं आहे. समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करुन, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं, सर्वांना एकत्र, समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंगभक्तीची, पंढरपूरवारीची परंपरा आपलं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. बा पांडुरंगाच्या कृपेनं कोरोनाचं संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीनं पंढरपूरला जाऊ शकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने रवाना
आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत. यावेळी नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. पण सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीज ऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.
सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस आहे. समोरची दृष्यमानता कमी आहे. अशावेळी मुख्यमंत्री सफाईदारपणे गाडी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 9 वाजताच्या सुमारास पंढरपुरात पोहोचतील. मुख्यमंत्री विमानाने मुंबईतून सोलापूरला जाऊ शकत होते, मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते बाय रोड अर्थात रस्ते मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कोलते दांपत्याला
आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या