‘महाराष्ट्र सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर’; तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल
"महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढे लोक बसले आहेत. त्यातील एकही नेता नाही. ते फक्त डीलर आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाने मते घेतात आणि भाजपाशी डिलिंग करतात. शरद पवार यांच्या नावाने मत घेतात आणि भाजपशी डिलिंग करतात", असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला.
मुंबई | 17 मार्च 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आज इंडिया आघाडीची आज भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. या सभेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. “महाराष्ट्र सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर आहेत”, असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला. “महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढे लोक बसले आहेत. त्यातील एकही नेता नाही. ते फक्त डीलर आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाने मते घेतात आणि भाजपाशी डिलिंग करतात. शरद पवार यांच्या नावाने मत घेतात आणि भाजपशी डिलिंग करतात. शरद पवार यांच्या नावाने मते घेऊन भाजपशी डिलिंग करतात. हे सर्व डिलर आहेत. नेते नाहीत”, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे आहे. मोदी म्हणजे खोटं बोलण्याची फॅक्ट्री आहेत. खोटे बोलण्याचे ते सेलर आणि होलसेलरही आहेत. मोदी यांनी आमच्या काकालाच पळवलं. मोदी सर्वांची गॅरंटी देतात. ते आमच्या काकांची (नितीशकुमार) यांची गॅरंटी देऊ शकतात का?”, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला.
‘मोदींनी पाच वर्षात पाच लाख नोकऱ्या तरी दिल्या का?’
“बिहारमध्ये यावेळी आश्चर्यकारक निकाल आम्ही आणून दाखवू. मीडियाने काहीही दाखवू द्या, सर्व्हेत काहीही दाखवू द्या, आम्ही जिंकून दाखवू. मोदींनी पाच वर्षात पाच लाख नोकऱ्या तरी दिल्या का? मोदींनी काहीच केलं नाही. राहुल गांधी यांनी सर्व गोष्टी काँट्रॅक्टवर केल्या आहेत. राहुल गांधी यांनी मोहब्बतची दुकान सुरूच ठेवावी. उद्या सत्तेत आलो नाही आलो तरी आपण जनतेत गेलं पाहिजे”, असं मत तेजस्वी यादव यांनी व्यक्त केलं.