घाटकोपरमध्ये अपघाताची भीषण घटना, टेम्पोने अनेकांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू
Mumbai Ghatkopar Accident : मुंबईच्या घाटकोपर येथे एका भरधाव टेम्पोने अनेकांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई कुर्ला येथील बेस्ट बसच्या अपघातापासून सावरलेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण प्रत्यक्षदर्शींनी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. अपघाताची ही भीषण घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
घाटकोपर पश्चिमेच्या चिराग नगर येथे एका भरधाव टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडलं. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन ते तीन जणांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ते गंभीर जखमी आहेत. संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास नारायण नगर येथून थंड पेय घेऊन जाणारा हा टेम्पो भरधाव वेगाने जात होता. यावेळी टेम्पो चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने पाच ते सहा जणांना धडक दिली. या घटनेनंतर जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. दरम्यान प्रत्यक्षदर्शीनुसार, आरोपीला लोकांनी पकडून घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम
या घटनेबाबत एका प्रत्यक्षदर्शीने प्रतिक्रिया दिली आहे. “गाडी भरधाव वेगात होती. त्या गाडीने महिलेला चिरडलं. त्या महिलेला टेम्पोने दूरपर्यंत फरफटत नेलं. त्या महिलेला आम्ही गाडीतून खेचून काढलं. पण तरीही तो टेम्पोचालक थांबला नाही. त्याने आणखी दोघांना जोराची धडक दिली. यापैकी एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. गाडीचालक नशेत होता. त्याला आम्ही पकडून एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं. नाहीतर संतप्त नागरिकांनी त्याला मारुन टाकलं असतं. पोलीस आल्यानंतर आम्ही गाडीचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिला. संबंधित टेम्पो हा आझाद नगर येथून आला होता. या घटनेत एका महिलेचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे”, अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शीने दिली.