Mumbai-Ahmedabad bullet train : बीकेसी स्थानकाचे टेंडर मंजूर, पाच वर्षांत स्थानक बांधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे महाराष्ट्रातील पहिले टेंडर निघाले आहे.
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरूवातीचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ( BKC ) अंडरग्राऊंड टर्मिनल स्थानकाचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. बुलेट ट्रेनचे गुजरात येथील काम वेगाने सुरू असून महाराष्ट्रातील भूसंपादन रखडले होते, आता बीकेसीच्या 4.85 हेक्टर जागेवर 3,681 कोटीच्या रक्कमेतून 54 महिन्यांत बुलेट ट्रेनच्या ( BULLET TRAIN ) सुरूवातीच्या भूयारी टर्मिनल स्थानकाचे बांधकाम होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला रेल्वे अर्थसंकल्पात नुकताच 19, 952 कोटीचा निधी रेल्वेने मंजूर केला आहे.
मुंबई ते अहमहाबाद दोन शहरांना जोडणाऱ्या 508 कि.मी. लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दर ताशी 350 कि.मी.च्या वेगाने तीन तासात अहमदाबाद गाठता येणार आहे. मेसर्स एमईआयएल – एचसीसी यांच्या जॉईंट व्हेंचरने हे कंत्राट जिंकले आहे. मे.मेघा इंजिनिअरींग एण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. आणि मे.हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लि.यांना एकत्रितपणे हे स्थानक बांधण्याचे कंत्राट दिले आहे. एकूण 54 महिन्यात म्हणजेच पाच वर्षांत हे भूयारी टर्मिनल बांधण्यात येणार आहे.
बुलेट ट्रेनच्या सी-1 पॅकेजमध्ये ‘कट एण्ड कव्हर’ पद्धतीचे 467 मीटर लांबीचे बांधकाम होणार आहे, तर व्हेंटीलेशन शाफ्टसाठी 66 मीटरचे बांधकाम होणार आहे. टनेल बोअरींग मशीन बाहेर काढण्यासाठी या शाफ्टचा वापर होणार आहे. तर पॅकेज – 2 मध्ये समुद्राखालील सात किमीसह एकूण 21 किमी लांबीच्या बोगद्याचे ( tunnel ) बांधकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रीया सुरू आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने या मार्गावरील मुंबईतील चार स्थानकांचे डीझाईन जाहीर केले आहे. यात बीकेसीतील भुमिगत स्थानकाचे डीझाईन समुद्राच्या लाटांच्या थीमवर आधारीत आहे.
बीकेसीचे एकमेव अंडरग्राऊंड स्थानक
या मार्गावरील बीकेसी हे एकमेव अंडरग्राऊंड स्थानक असणार आहे. येथे तीन माळ्याचे स्थानक असणार आहे. प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स आणि सर्व्हीस फ्लोअर असे तीन मजले असणार आहेत. जमीनीच्या पातळीपासून 24 मीटर खाली फलाट असणार आहेत. बीकेसी स्थानकासाठी 6 प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार असून ते 16 डब्याच्या ट्रेनसाठी असतील. स्थानकाला दोन एण्ट्री व एक्झीट पॉईंट असणार आहेत. एक प्रवेशद्वार मेट्रो लाईन 2 – बी बरोबर कनेक्ट केलेले असणार असून दुसरे गेट एमटीएनएल इमारतीच्या दिशेला असणार आहे.
आठ स्थानके गुजरातमध्ये तर चार महाराष्ट्रात
बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण 12 स्थानके असणार असून त्यात 8 स्थानके गुजरातमध्ये तर 4 स्थानके महाराष्ट्रात असणार आहेत. साबरमती, अहमदाबाद, आणंद/नाडीयाड, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी ही आठ स्थानके गुजरातमध्ये तर बोयसर, विरार, ठाणे, बीकेसी अशी चार स्थानके महाराष्ट्रात आहेत.