फडणवीस यांच्याकडून भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्र धुण्याचे काम, कर्णपिशाचाने ग्रासले काय?; ‘सामना’तून संतप्त सवाल
कदाचित शिंदे गटाची लुटमार नजरेआड करा अशा सूचना त्यांना दिल्लीहून आल्या असाव्यात किंवा महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जादूटोण्याचा हा परिणाम असावा.
मुंबई: सत्ताधाऱ्यांनी सत्तेतील आमदार आणि मंत्र्यांना क्लीनचिट देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून आजच्या दैनिक ‘सामना’च्या ‘अग्रलेखा’तून जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. सभोवती भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फुटत असतानाही देवेंद्र फडणवीस म्हणतात, ” कुठे काय? मला तर लवंगी फटाक्याचाही आवाज ऐकू येत नाही.” या जादूटोण्यास काय म्हणावे? नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे, पण फडणवीसांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही. त्यांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय?, असा संतप्त सवाल करतानाच तसे असेल तर महाराष्ट्राच्या भविष्याविषयी आम्हाला चिंता वाटते! हनुमानाच्या शेपटास आग लावून देण्याचा उपद्व्याप त्या काळात झाला. त्या शेपटाने रावणाची लंका जळून गेली हे विसरू नका, असा इशाराच सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
अग्रलेखातून हल्लाबोल काय?
विधानसभेत विरोधकांकडून रोज भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फोडले जात आहेत. फडणवीस यांना ते ऐकू जात नसतील तर तो त्यांचा राजकीय कर्णदोष म्हणावा लागेल.
विरोधकांनी फोडलेला हा बॉम्ब लवंगी फटाक्याच्याही तोडीचा नाही, असे वाटणे हे सरकारच्या निर्ढावलेपणाचे लक्षण आहे. फडणवीस हे कोणत्या जादूटोण्याच्या दबावाखाली काम करीत आहेत? की विरोधकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध फोडलेले बॉम्ब त्यांना अस्वस्थ करीत नाहीत.
आमच्या राज्यात शे-पाचशे कोटींचे घोटाळे होणारच असेच फडणवीस यांना सांगायचे आहे काय? संजय राठोड, उदय सामंत, शंभू देसाई अशा मंत्र्यांचेही घोटाळे समोर आले आहेत. ही भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्र धुण्याचे काम महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना करावे लागत आहे.
इतके गंभीर प्रकरणही फडणवीस यांना विचलित करत नसेल तर त्यांची संस्कृती व संस्कार बदलले आहेत आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे ते गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत.
कदाचित शिंदे गटाची लुटमार नजरेआड करा अशा सूचना त्यांना दिल्लीहून आल्या असाव्यात किंवा महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जादूटोण्याचा हा परिणाम असावा.
विधानसभेत सीमाप्रश्नी जो ठराव आणला गेला तो इतका गुळमुळीत की, त्यात सीमा भाग केंद्रशासित करण्यासंदर्भात एक ओळही नाही. ही फसवणूक नाही तर काय? सीमा बांधवांची फसवणूक म्हणजे महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची फसवणूक.
महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेला व्यभिचार, पण भ्रष्टाचार आणि राजकीय व्यभिचाराची नोंद घ्यायचीच नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आहे.