केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार, मग हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे?; ठाकरे गटाचा भाजपला रोखठोक सवाल
गेल्या आठ वर्षापासून केंद्रात मोदींचे रामराज्य सुरू आहे. राज्यातही भाजपचं सरकार आहे. हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचे लोक मानतात. मग तरीही हिंदूंचा आक्रोश मोर्चा निघावा हे आश्चर्य आहे.
मुंबई: सकल हिंदू समाजाचा काल मुंबईत मोर्चा निघाला. दादरच्या शिवाजी पार्कवरून या मोर्चाची सुरुवात झाली आणि परळच्या कामगार मैदानावर या मोर्चाची सांगता झाली. शिवसेना भवनासमोरूनच हा मोर्चा निघाला. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हा मोर्चा निघाला होता. या मोर्चावरून दैनिक ‘सामना’तून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात सर्व शक्तीमान हिंदुत्वादी सरकार असताना हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? असा सवाल करतानाच शिवसेना भवन हेच सकल हिंदूंसाठी आशेचे स्थान आहे, असा टोला दैनिक ‘सामना’तून भाजपला लगावला आहे.
जेव्हा जेव्हा पराभवाचे हादरे बसू लागतात तेव्हा तेव्हा भाजपचा एक हुकूमी खेळ सुरू होतो. तो म्हणजे हिंदू-मुस्लिम. आताही हा खेळ सुरू आहे. त्यामुळेच देशातील हिंदू अचानक खतऱ्यात आल्याचं सांगत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपचेच लोक आघाडीवर होते.
परंतु, हे मोर्चे म्हणजे स्वत:च्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचा प्रकार आहे, अशी टीका करतानाच केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे. मग हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? असा सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
आक्रोश मोर्चा निघावा हे आश्चर्य
गेल्या आठ वर्षापासून केंद्रात मोदींचे रामराज्य सुरू आहे. राज्यातही भाजपचं सरकार आहे. हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचे लोक मानतात. मग तरीही हिंदूंचा आक्रोश मोर्चा निघावा हे आश्चर्य आहे, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
त्या राजवटीत काही तरी दोष
गुजरात, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंदुत्व खतऱ्यात येत असेल त्या राजवटीत काही तरी दोष आहेत. हिंदू जन आक्रश मोर्चा केवळ निवडणुका किंवा राजकीय फायद्यासाठी होत असेल तर ती हिंदुत्वाशी बेईमानी ठरेल, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.
धर्मांतरे का होत आहेत?
देशात प्रखर हिंदुत्ववाद्यांचे शक्तीमान राज्य असतानाही ही सक्तीची धर्मांतरे का होत आहेत? हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे अपयश आहे. त्या अपयशाचा निषेध करण्यासाठी हिंदू मुंबईत रस्त्यावर उतरला असेल तर त्यांचे काय चुकले? असा सवालही यावेळी करणअयात आला आहे.
त्या सगळ्यांचे शिवसेनेवर ‘लव्ह’
मुलायम सिंह यादव यांचा राष्ट्रीय गौरव केल्यानेच शिवसेना भवनासमोर हिंदू जन आक्रोश उसळला. त्या सगळ्यांचे शिवसेनेवर ‘लव्ह’ आहे. दिल्लीच्या ढोंगी सरकारविरुद्ध ‘जिहाद’ आहे. या मोर्चासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडण्यात आला. याचा अर्थ हिंदूंसाठी शिवसेना आणि शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे, असा टोलाही लगावण्यात आला आहे.