एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली; ठाकरे गटाचे काँग्रेसला खडेबोल
फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाला जाग आली नाही. अन् एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली.
मुंबई: नाशिक पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज मिळूनही काँग्रेसच्या डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्या मुलासाठीच सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा देण्याची भाषा सुरू केल्याने काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीतही खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने आता काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली आहे, असं म्हणत ठाकरे गटाने काँग्रेसलाही सुनावले आहे.
ठाकरे गटाचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनातून हे खडेबोल सुनावण्यात आले आहेत. सत्यजित तांबे हे ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले होते.
अशा माणसाने फक्त एका आमदारकीसाटी भाजपच्या खेळीचे बळी व्हावे हे न पटणारे आहे, असा उद्वेग दैनिक सामनातून व्यक्त करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यगिरीमुळे नाशिकमध्ये असं घडल्याचं सांगितलं जातं. पण सत्ता आणि केंद्रीय यंत्रणा हाती आल्या की असे पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात, अशी टीका करतानाच यात राजकीय खेळी कमी आणि सत्तेचा गैरवापर अधिक आहे, असा हल्लाही अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.
फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाला जाग आली नाही. अन् एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली. यात सर्वात गोंधळ उडाला तो महाविकास आघाडीचा, असा घरचा आहेरही देण्यात आला आहे.
यावेळी नागपूरच्या निवडणुकीवरूनही टीका करण्यात आली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसने शिवसेनेसाठी सोडला. पण तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तिथेही उमेदवार दिल्याने बेकीचे चित्रं दिसलं आहे, अशी कबुलीही देण्यात आली आहे.