ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत?; नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, बोजरिया यांचं काय होणार?
शिदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. विधानसभेतीलआमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू असतानाच आता ठाकरे गटाने विधान परिषदेतील आमदारांकडेही लक्ष वळवलं आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर लवकरच सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढील आठवड्यात ही सुनावणी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या दोन तीन आठवड्यात शिवसेनेतील चित्र स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर शिंदे गट आणि ठाकरे गटाचं भवितव्यही स्पष्ट होणार आहे. या घडामोडी घडत असतानाच आता विधान परिषदेतील शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे या आमदारांचे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे गटाकडून पावसाळी अधिवेशनात शिंदे गटातील विधान परिषदेच्या तीन आमदारांविरोधात कार्यवाही करण्याचं पत्र सचिवांना देण्यात आलं होतं. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बिप्लव बजोरिया यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. मात्र, हे पत्र अजूनही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे या आमदारांविरोधात कार्यावाही सुरू झालेली नाही. कार्यवाहीला विलंब होत असल्याने ठाकरे गट अधिकच आक्रमक झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात जाणार
विधानपरिषदेच्या तिन्ही आमदारांविरोधात काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे या आमदारांविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ठाकरे गटाने तशा हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली नाही. त्यांनी चार महिने वेळकाढूपणा केला. त्यामुळे ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली. त्यावेळी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले. त्याच पद्धतीने विधान परिषदेच्या आमदारांबाबतही कार्यवाही होत नसल्याने संबंधितांना फटकार लगावण्यासाठी आणि कार्यवाहीचे आदेश देण्यासाठी ठाकरे गट कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
तिघेही शिंदे गटाचे
विप्लव बजोरीया हे सुरुवातीलाच शिंदे गटासोबत गेले होते. तर मनिषा कायंदे या अलिकडच्या काळात शिंदे गटात सामील झाल्या. कायंदे यांच्यानंतर नीलम गोऱ्हे यांनीही शिंदे गटाची वाट धरली. हे तिन्ही नेते विधान परिषदेचे सदस्य आहेत. तिघांनीही पक्षातील कारभारावर बोट ठेवत विकास कामासाठी शिंदे गटात जात असल्याचं म्हटलं होतं.