ठाकरे सरकारचा भाजपला ‘दे धक्का’, पुनर्वसन प्राधिकरणातील भाजपच्या बड्या नेत्याची नियुक्ती रद्द
भाजपचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांची पुनर्वसन प्राधिकरणावरची नियुक्ती शासनाने रद्द केली आहे.

मुंबई : ठाकरे सरकारने भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांची पुनर्वसन प्राधिकरणातील नियुक्ती महाराष्ट्र शासनाने रद्द केली आहे.
फडणवीस सरकारमधील प्राधिकरण आणि महामंडळांवरच्या अनेक नियुक्त्या रद्द करण्याचं सत्र ठाकरे सरकारने सुरुच ठेवलं आहे. पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्ष पदावरुन आज माधव भांडारी (BJP Leader Madhav Bhandari) यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.
फडणवीस सरकारने 28 एप्रिल 2018 रोजी माधव भांडारी यांची महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता. मात्र, आज त्यांची नियुक्ती ठाकरे सरकारने रद्द केली आहे.
भाजपच्या स्थापनेपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून माधव भांडारी यांची ओळख आहे. ते भाजपचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांचे ते निकटचे नातेवाईक आहेत.