पक्षप्रवेशाच्याच दिवशी दिशा सालियान केसचा उल्लेख, राहुल कनाल नेमकं काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी दिशा सालियान केसचा उल्लेख करत याप्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली.
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर याबाबतच्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या शेरबाजीतून आपण पक्षप्रवेशाचा निर्णय का घेतला? याचं उत्तर दिलं आहे. राहुल कनाल यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांना उद्देशून काही भावनिक प्रसंगदेखील सांगितले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे किंवा ठाकरे गटावर थेट टीका करणं टाळल्याचं बघायला मिळालं. पण यावेळी त्यांनी दिशा सालियान प्रकरणाचा उल्लेख केला.
“सर्वांना जय महाराष्ट्र! साहेब, सर्वात आधी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, आम्ही सर्व आपल्याला लहानपणापासून पाहत आलोय. आपल्याकडून शिकत आलोय. आम्ही राजकारणात आलो तेव्ही मी माझ्य भाग्य समजतो की, 32 वर्षांपासून माझे वडील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भेट घडवून आणली होती. मला चांगल्याप्रकारे आठवत आहे”, असं राहुल कनाल म्हणाले.
राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदेंसोबतची आठवण सांगितली
“कोरोना काळात वांद्रे पश्चिम, खार या भागात आम्ही सर्वजण माणसं तसेच जनावरांना अन्न खाऊ घालत होतो. पोलीस आणि मुंबई महापालिकादेखील आमच्यासोबत काम करत होती. आम्ही ठरवलं होतं की, मुंबईत जितके जनावरं आहेत त्यांना अन्न खाऊ घालू. तुम्ही किंवा मी रस्त्यावर नव्हतो तेव्हा त्यांना अन्न खाऊ घालणारं नव्हतं. तेव्हा आपण आम्हाला वांद्रेची एमआयडीसीची संपूर्ण जागा दिली होती”, अशी आठवण राहुल कनाल यांनी सांगितली.
“तुम्ही दर दोन दिवसाला आम्हाला काय हवं नको ते याची विचारपूस करायचे. आम्ही त्यावेळी फक्त जेवण बांधायचो आणि लोकं तसेच जनावरांपर्यंत पोहोचवायचं काम करायचो. आम्ही ही पुण्याई आपल्यापासून शिकलो. आपल्यासारखं आम्ही एक टक्केदेखील करु शकलो तर ते आम्ही मुंबईला अर्पण केलं”, असं राहुल कनाल म्हणाले.
‘राजकारणाला बाजूला ठेवून आपल्यासोबत येण्याचं काम केलं’
“आपण आमचे नेते आहात. आम्ही आज पाहिलं की तुम्ही आज सर्व काही सोडलं आणि बुलडाण्याला पोहोचलात. तसंच आम्हीसुद्धा आज राजकारणाला बाजूला ठेवून आपल्यासोबत येण्याचं काम केलं आहे”, असं राहुल कनाल म्हणाले.
“मी आपल्यासोबत यायचा निर्णय घेतला तेव्हा दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा कानावर ऐकायला येत आहेत. कुणी म्हणतंय की, आपल्याला पक्षाने भरपूर काही दिलं. हो दिलं. पण त्याच्या हजार टक्के मी नाही दिलं तर तुम्ही सार्वजनिकरित्या येऊन बोलून दाखवा”, असं राहुल कनाल म्हणाले.
राहुल कनाल यांच्याकडून दिशा सालियान केसचा उल्लेख
“साहेब, तुम्ही आम्हाला पाहिलं आहे. आम्ही जनआशीर्वाद यात्रा असेल किंवा इतर काम असेल, आम्ही आपल्यासोबत काम केलं. आपण जशी कोविड काळत काम केलं तसंच आम्ही छोट्या पातळीवर काम केलं आहे. माझे वडील आज पहिल्यांदा आले आहेत. माझे वडील आपल्याला मानतात”, असंही कनाल म्हणाले.
“लोकांचं म्हणणं आहे की, हा कदाचित सुशांत सिंह राजपूत किंवा दिशा सालियान केस प्रकरणामुळे तिथे गेला असेल. पण सर मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की, हे आरोप माझ्यावर नेहमी करण्यात येत आहे”, असं राहुल कनाल यांनी सांगितलं.
“मी आपल्याला विनंती करतो की, आपण या प्रकरणी कृपया करुन तपास करण्याचे आदेश द्या. या प्रकरणात कुठेही माझं नाव आलं तर कारवाई करा. या प्रकरणात तपास करण्याची जास्त आवश्यकता आहे. तुम्ही मला जिथे जायला सांगाल तिथे आम्ही जाऊ”, असा शब्द राहुल कनाल यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
“बात घमंडची नाही, बात इज्जतची आहे. लोगोने अपने लहजे बदल दिए, हमने अपने रास्ते बदल दिए”, असा शेर बोलत राहुल कनाल यांनी आपण भाषण संपवलं.