शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार? सचिन अहिर यांचा मोठा दावा
"भाजपने 23 जागांवर त्यानी निरीक्षक नेमले आहेत. उरलेल्या जागांवर अजित पवार गट आणि शिंदे गट यांना समाधान मानावं लागेल. भाजपचे आमदार खाजगीत सांगतायत की कामाला लागा असं सांगितलं आहे", अशी आतली बातमी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिली.

प्रदीप कापसे, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : “काही लोकांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा, असं सांगितलं जातंय”, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे. “विशेष म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गटातील काहीजण निवडणूक लढवायला तयारही होत आहेत”, असादेखील दावा सचिन अहिर यांनी केला. “भाजपने 23 जागांवर त्यानी निरीक्षक नेमले आहेत. उरलेल्या जागांवर अजित पवार गट आणि शिंदे गट यांना समाधान मानावं लागेल. भाजपचे आमदार खाजगीत सांगतायत की कामाला लागा असं सांगितलं आहे. आता तर स्पष्टच झालं आहे की 23 निरीक्षक त्यांनी नेमले आहेत”, असं सचिन अहिर म्हणाले.
“शिवाजीराव आढळराव पाटलांचं आश्चर्य वाटत की ज्या कारणासाठी ते बाहेर पडले आज तेच अजित पवार गटाकडे जात आहेत अशी चर्चा आहे. त्यांना मतदारांकडे जाण्याचा नैतिक अधिकार आहे का?”, असा सवाल सचिन अहिर यांनी केलाय. “शिरुरची जागा राष्ट्रवादी लढवेल आणि मावळची जागा ही आम्हाला मिळेल. अजित पवार यांना शरद पवारांमुळे कामाची संधी मिळाली हे ते नाकारू शकत नाहीत”, असं सचिन अहिर यांनी म्हटलं.
भाजपकडून ‘या’ 23 जागांवर निरीक्षण नेमण्यात आले
राज्यात लोकसभेसाठी भाजपच्या 23 जागा पक्क्या आहेत. भाजपकडून लोकसभेच्या 23 जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून बारामतीच्या जागेसाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. बारामतीची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसाठी भाजपकडून निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. या जागांसाठी शिंदे गट आग्रही आहे.
भाजपकडून लोकसभेच्या मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, पुणे, नागपूर, भिवंडी, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, वर्धा, अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, माढा, सांगली या 23 जागांवर भाजपकडून निरीक्षक नेमण्यात आले आहेत.