वायकरांसाठी 650 मतांच्या हेराफेरीचा आरोप, ठाकरे गट निकालाच्या विरोधात कोर्टात जाणार
रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकरांची यांच्यात उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. शिंदे गटाच्या वायकरांना विजयी घोषित करण्यात आलं. मात्र ठाकरे गटानं नवा दावा केलाय. 650 मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप ठाकरे गटानं पत्रकार परिषदेतून करुन केलाय.
शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकरांना विजयी करताना, निवडणूक आयोगाच्या अधिकारी वंदना सूर्यवंशींनी 650 मतांचा घोळ केल्याचा थेट आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. त्यासाठीच CCTV फुटेज देत नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणंय. 4 जूनला EVMच्या मतमोजणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर एका मतानं आघाडीवर होते. पोस्टल मतांमध्ये वायकरांना 49 मतं अधिक मिळाल्यानं 48 मतांनी शिंदेंच्या शिवसेनेचे वायकर विजयी घोषित झाले. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परबांनी पत्रकार परिषद घेवून सांगितलंय की, 19 व्या फेरीनंतर प्रत्येक फेरीची आकडेवारी घोषित केलीच नाही. 23 व्या फेरीनंतर निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींनी एकाचवेळी सर्व आकडेवारी वाचली. 19 ते 23 व्या फेरीपर्यंत ठाकरे गटाचे निवडणूक प्रतिनिधी आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या आकडेवारीत 650 मतांचा फरक असल्याचं परबांचं म्हणणंय.
आता यासंपूर्ण प्रकरणात, आरोप आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यात रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी…याच वंदना सूर्यवंशी निकालाच्या दिवशी वारंवार बाथरुमला जावून फोनवर बोलत होत्या, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे.
आणखी एक बाब म्हणजे, निकालाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपडेट करण्यासाठी यंत्रणेच्या एका व्यक्तीलाच, मोबाईल वापरण्यास परवानगी असते. त्यानुसार गुरव नावाचा व्यक्ती मोबाईल वापरत होता. मात्र गुरवकडचाच मोबाईल शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी घोषित झालेले उमेदवार रवींद्र वायकरांचे मेहुणे पंडीलकर यांच्याकडे आढळला आणि याची कबुली निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींनी पण दिलीये.
ठाकरेंच्या शिवसेनेला मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज देण्यास नकार देण्यात आलाय. त्यामुळं 2-3 दिवसांत अमोल कीर्तिकरांच्या वतीनं ठाकरेंची शिवसेना कोर्टात जाणार आहे.
याआधी काही महिन्यांआधीच, चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मतांच्या हेराफेरीच्या आरोपात, आम आदमी पार्टी सुप्रीम कोर्टात गेली होती. आणि त्यानंतर कोर्टानं निकाल फिरवत भाजपला झटका दिला आणि आम आदमी पार्टीच्या बाजूनं निकाल दिला होता. आता ठाकरेंची शिवसेना, वायकरांच्या निकालाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. त्यामुळं याही सुनावणी आणि निकालाकडे नजरा असतील.