रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, अखेर पोलीस आयुक्तांचा अहवाल सादर; महिला आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांनी अखेर अहवाल सादर केला आहे. राज्य महिला आयोगाच्या आदेशानंतर हा अहवाल सादर केला आहे.
मुंबई : ठाण्यातील रोशनी शिंदे या महिलेला मारहाण झाल्यानंतर त्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. या घटनेनंतर ठाकरे गटाने ठाण्यात मोठा मोर्चा काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर रोशनी शिंदे यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता त्यात महिला आयोगाने उडी घेतली आहे. महिला आयोगाने या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आयुक्त ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले. त्यानंतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अहवाल सादर केला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे आदेश दिले आहेत. फेसबुक या समाज माध्यमावर पोस्ट केल्याचा राग धरून रोशनी शिंदे यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याची घटना वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. पोलीस आयुक्त ठाणे यांना या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल व्यक्तिशः आयोग कार्यालयात उपस्थित राहून सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. याबाबतीत अहवाल सादर करण्यासाठी कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आव्हाड हे आयोग कार्यालयामध्ये उपस्थित झाले असून त्यांनी महिला आयोगाकडे या प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता हा अहवाल पाहून महिला आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे प्रकरण?
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली होती. रोशनी या गर्भवती आहेत. त्यांच्या पोटावर मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची कुणी तक्रार घेतली नव्हती. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याचं कळताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस आयुक्त जागेवर नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला होता.
जनआक्रोश उसळला
या घटनेनंतर ठाकरे गटाकडून पोलीस आयुक्तालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल ठाण्यात जनआक्रोश मोर्चा पार पडला. यावेळी माजी मंत्री अनिल परब, विनायक घोसाळकर, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.