देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार; प्रवासाचे अंतरही कमी होणार
ब्लास्टिंग दरम्यान, केवळ वाहतूकच नाही तर ब्लास्टिंग ठिकाणांजवळील काम देखील थांबवले जाते. आणि मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री ब्लास्टिंग प्रभाव क्षेत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवली जाते.
मुंबई: भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड रोड ब्रिज (bridge)महाराष्ट्रात बांधला जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्पातील पायाभूतसुविधा क्षेत्रातील प्रमुख कंपनी अफकॉन्सद्वारे हा 132 मीटर उंच पूल बांधला जात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची (Mumbai-Pune Expressway) खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतची लांबी सुमारे 19 किलोमीटर आहे. मिसिंग लिंक प्रकल्प (Missing Link project) खंडाळा घाट विभागाला बायपास करेल आणि एक्सप्रेसवेचे अंतर 6 किलोमीटरहून कमी करेल आणि प्रवासाचा वेळ 25 मिनिटांपेक्षा कमी करेल.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प दोन पॅकेजमध्ये विभागलेला आहे. अफकॉन्स पॅकेज-दोन चे काम करत आहे. पॅकेज-दोन मध्ये विद्यमान द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण, दोन व्हायाडक्ट (उड्डाणपूल), त्यापैकी एका व्हायाडक्टमध्ये केबल-स्टेड ब्रिज, यासह इतर कामांचा समावेश आहे.
सुमारे 850 मीटर लांबीच्या व्हायाडक्ट-I साठी फाउंडेशनचे पूर्ण झाले आहे आणि प्री-टेन्शन गर्डर्स आणि डेक पॅनेलचे लॉन्चिंग प्रगतीपथावर आहे. व्हायाडक्ट -II, जेथे केबल-स्टेड पूल बांधला जात आहे तो सुमारे 650 मीटर लांब आहे. हा पूल जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असेल जो देशातील कोणत्याही रस्ते प्रकल्पामधील सर्वात उंच असेल.
“सध्या, व्हायाडक्ट-II मध्ये फाउंडेशन, पिलर आणि पायलॉन (केबल स्टेड ब्रिज पिलर) बांधण्याचे काम सुरू आहे. या व्हायाडक्टमधील सर्वात उंच पायलॉन जमिनीच्या पातळीपासून 182 मीटर असेल आणि हे भारतातील कोणत्याही कोणत्याही रस्ते प्रकल्पातील सार्वधिक उंच असेल,” असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक रणजित झा म्हणाले.
“खंडाळा घाट हा भूस्खलन आणि अपघातप्रवण भाग आहे. नवीन लिंकमुळे अपघात कमी होण्यासोबतच इंधन कार्यक्षमता सुधारण्यास आणि वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल,” ते पुढे म्हणाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पॅकेज-II चे काम 2019 मध्ये सुरू झाले आणि ते 2024 मध्ये पूर्ण होईल.
प्रकल्पाला विविध भूवैज्ञानिक, वाहतूक आणि अत्यंत अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. सध्याच्या एक्स्प्रेस वे चे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये टेकडी तोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागते.
ब्लास्टिंग दरम्यान, केवळ वाहतूकच नाही तर ब्लास्टिंग ठिकाणांजवळील काम देखील थांबवले जाते. आणि मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री ब्लास्टिंग प्रभाव क्षेत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवली जाते. द्रुतगती मार्गावरील अवजड वाहतुकीदरम्यान सामग्रीची वाहतूक आणि गर्डरचे स्थलांतर हीसुद्धा टीमसमोरील इतर काही आव्हाने आहेत.
पॅकेज-II ची वैशिष्ट्ये
5.86 किमी सध्याच्या द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण
10.2 किमी अप्रोच रस्त्यांचे बांधकाम
132 मीटर उंच केबल-स्टेड ब्रिजचे बांधकाम
केबल-स्टेड ब्रिजमध्ये 182M चा उंचीचा सर्वात उंच पायलॉन