मुंबई: मुंबई महापालिकेतही (bmc) राजकीय पक्षांना नगरसेवक संख्येच्या प्रमाणात निधी देण्याबाबत शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांनी हे सुतोवाच केलं आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या या निर्णयाचं स्वागत करणार की विरोध? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, मुंबई महानगरपालिकेचा 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये (standing committee) सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पावर तब्बल 11 तास चर्चा झाली. त्यात 12 सदस्यांनी सहभाग घेतला. आज अर्थसंकल्पात 650 कोटी रुपयांची फेरफार करत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामुळे स्थायी समितीला 650 कोटी रुपयांचाह निधी मिळाला असून त्याचे प्रचलित नियमानुसार वाटप केले जाईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर यशवंत जाधव यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पालिकेच्या “ब” अर्थसंकल्पातून “अ” अर्थसंकल्पात 650 कोटींचा निधी वळवल्याने स्थायी समिती 24 विभागात निधीचे सामान वाटप केले जाणार आहे. यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे नगरसेवक जास्त किंवा कमी संख्येने निवडून आल्यास कोणावरही अन्याय होणार नाही. यानुसार निधी वाटप केले जाईल. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्याचा निर्णय येत्या काळात घेतला जाईल, अशी माहिती यशवंत जाधव यांनी दिली.
आज अर्थसंकल्प मंजूर करताना 650 कोटी रूपये स्थायी समितीला मिळाले आहेत. त्यात पालिकेच्या प्रत्येक वॉर्डला निधी दिला जाणार आहे. यासाठी नगरसेवकांना आपल्या विभागातील किंवा इतर कामांसाठी पत्र देऊन सुचवावी लागणार आहेत. अशी पत्र देण्याचे सर्वपक्षीय गटनेत्यांना सांगण्यात आले आहे. जे नगरसेवक पत्र देतील त्यांच्या कामासाठी निधी राखीव ठेवला जाईल, असं जाधव यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेचा सन 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प महापालिकेत मांडण्यात आला होता. स्थायी समितीअध्यक्ष यशवंत जाधव यांनी 11 मार्चला यावर आपले अर्थसंकल्पीय भाषण केले, या अर्थसंकल्पावरील चर्चेत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक अशा 12 सदस्यांनी सहभाग घेतला होता.
भाजपा प्रत्येक कामाला विरोध करते. चांगले काम केले तरी ते विरोध करतात. विरोध हा त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. चांगलं काही करायचे नाही आणि चांगले केले तर त्याला विरोध करायचा हेच त्यांचे काम आहे. ते विरोध करत राहतील. आम्ही विकासाचे काम करत राहू. मुंबईकरांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे. आम्ही मुंबईचा विकास करत राहू, असं ते म्हणाले.
Fast News | महत्वाच्या बातम्या | 22 February 2022 pic.twitter.com/JDAudH5VJX
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2022
संबंधित बातम्या:
घर मिळवण्यासाठीचा संघर्ष लक्षात ठेवा, घरं विकून, मुंबई सोडून जाऊ नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Election :अहमनदरच्या राजूरमध्ये विशेष मतदान कशासाठी, विहीर खोदण्यासाठी, निकाल कुणाच्या बाजूनं?