तेजस ठाकरे अन् टीमकडून 10 नवीन प्रजातींचा शोध, जैवविविधतेवर टाकला प्रकाश
Tejas Thackeray | तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन नवनवीन प्रजातींचा शोध घेते. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत आणि जंगलात या टीमचे काम सुरु आहे. यावर्षी 2023 मध्ये त्यांनी एकूण 10 नवीन जंगलातील प्रजातींचा शोध लावला. यामध्ये साप, खेकडा, पाल आणि सरडा यांचा समावेश आहे.
निवृत्ती बाबर, प्रतिनिधी, मुंबई | 31 डिसेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिंरजीव तेजस ठाकरे यांनी आणि त्यांच्या टीमने या वर्षांत नवनवीन प्रजातींचा शोध लावला. त्यांनी जंगलात आणि सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यात जाऊन संशोधनाचे कार्य केले आणि दुर्मिळ प्रजाती उजेडात आणल्या. यावर्षात त्यांनी एकूण 10 नवीन जंगलातील प्रजातींचा शोध लावला आहे यामध्ये साप, खेकडा, पाल आणि सरडा यांचा समावेश आहे. यापूर्वी पालींवर संशोधनावर, त्यांचा शोध निबंध जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या व्हर्टब्रेज झुलॉजी या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.
सापाच्या नवीन प्रजातीचा शोध
तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने दुर्मिळ पाली, सरडे, साप आणि माशांचाही शोध लावला आहे. मध्यंतरी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. त्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली होती. त्यांनी सापाची नवीन प्रजाती शोधली. तिला सह्याद्रीओफिस उत्तरघाटी असे नाव दिले होते. जगापासून अलिप्त असलेल्या सह्याद्रीच्या भागात जाऊन त्यांनी हे संशोधन केले. त्यांनी खेकडे, मासे, पाली अशा अनेक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला.
संशोधनात अनेक पालींचा समावेश
निमास्पिस टायग्रीस, निमास्पिस सक्लेशपुरेनासिस, निमास्पिस विजयाई आणि इतर पालींच्या नवीन प्रजातींचा शोध या टीमने लावला. अशा जातीच्या प्रजाती भारतासह श्रीलंका, थायलंड, सुमात्रासह इतर बेटांवर आढळून येतात. आतापर्यंत पालीच्या भारतातील 68 प्रजाती समोर आल्या आहेत. त्यात आता तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमच्या संशोधनाची भर पडली आहे. त्यामुळे वन्य जातींचे जग फार मोठे असल्याचे समोर आले आहे.
सोनेरी माशाची प्रजाती
तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रागांतील अंबोली घाटात माशाची चौथी नवीन प्रजाती समोर आणली होती. हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या माशाचा शोध त्यांनी लावला. त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या आहेत. नवीन वर्षात जोमाने हे काम करण्यात येणार आहे. नवीन वर्षात अजून दुर्मिळ प्रजाती शोधण्याचा मानस या टीमने व्यक्त केला आहे.