गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : शिंदे गटाचे नेते, आमदार संजय गायकवाड यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड यांचा सर्व रोख आधीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय गायकवाड यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंना दुसरं काही देणार नव्हते त्यांना मौत देणार होते. मौत. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचा एन्काऊंटर करणार होते. म्हणून त्यांचं संरक्षण काढलं होतं. मी मोठा गौप्यस्फोट करत आहे. जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे, असा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शंभुराजे देसाई गृहमंत्री होते. त्यांच्या घरी बैठक सुरू होती. मातोश्रीवरून फोन आला. त्यांना सुरक्षा देऊ नका. याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपलेले होते असंच ना? शिंदे राजकारणातून खतम होत नाही म्हणून त्यांना नक्षल्यांच्या हातून मारणार होते. म्हणून तुम्ही त्यांना सेक्युरीटी नाकारली, असा दावाच गायकवाड यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. राऊत यांना मला सांगायचे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा उद्धव ठाकरे याचा जो ललित पाटील सोबत फोटो आहे तो फोटो आधी पाहावा. मग उद्धव ठाकरेचे ललित पाटीलशी संबंध कसा? असा आरोप आम्ही करायचा का? याचं आधी उत्तर द्या. बिन बुडाचे आरोप करायचे, सरकारला बदनाम करायचं हा यांचा रोजचा कार्यक्रम झाला आहे. हे कट कारस्थान सरकारला बदनाम करण्याचं आहे. याचा आम्ही निषेध करतो. काही हाती लागणार नाही आणि तुमच्याच अडचणी वाढतील, असा इशाराच त्यांनी दिला.