Video : चार तासांपासून आजी, एक व्यक्ती आणि पाळीव कुत्रा ढिगाऱ्याखाली, मुंबईत बंगला खचला; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. तर घाटकोपरमध्ये एक बंगला खचला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : मुंबईत कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काल दुपारनंतर मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला. रात्रभर मुंबईत पाऊस सुरू होता. त्यामुळे मुंबईतील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर पहिल्याच पावसात मुंबईच्या नालेसफाईची पोलखोलही झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. पावसाची बॅटिंग सुरू असतानाच घाटकोपरमध्ये एक तीन मजली बंगला खचला आहे. हा बंगला खचल्याने त्यात दोनजण अडकले आहेत. गेल्या चार तासांपासून या दोघांनाही बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
घाटकोपर पूर्व येथील चित्तरंजन नगरातील राजावाडी कॉलनीत हा तीन मजली बंगला आहे. तळमजला अधिक तीन मजली हा बंगला आहे. या बंगल्याचे दोन मजले आत आहेत. जोरदार पावसामुळे हा बंगला खचला आणि त्यात एक आजी, एक व्यक्ती आणि एक पाळीव कुत्रा अडकला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं आहे. एनडीआरएफच्या टीमलाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलं असून पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. मात्र, चार तास झाले तरी या दोघांना आणि पाळीव कुत्र्याला बाहेर काढता आलेलं नाही. त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
वाहनांचं नुकसान
पहिल्या पावसामुळे मुंबईमध्ये घाटकोपर इथल्या राजावाडी परिसरातील ही तीन मजली इमारत जमिनीत धसली. सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या ढिगाऱ्याखाली दोनजण अडकले आहेत. तर चार जणांना गंभीर दुखापत झाली. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बंगला खचल्याने बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच या बंगल्याला टेकू देण्यासाठी लोखंडी पोल लावण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
मदतकार्य सुरू
दरम्यान, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळला आहे. त्यानंतर तिथे डिझास्टर टीम पोहोचली आहे आणि त्या ठिकाणी मदत पोहोचवली आहे, असं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
#WATCH | Mumbai: Portion of a building collapsed in Rajawadi Colony, Ghatkopar (East). Rescue operation is underway.
4 people have been safely rescued and 2 people are still trapped inside, rescue work is underway, says Maharastra Minister Mangal Prabhat Lodha https://t.co/itXjtrcn7Z pic.twitter.com/rLwA6qsNhp
— ANI (@ANI) June 25, 2023
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईत कालपासून पाऊस सक्रिय झाला आहे. काल दुपारनंतर मुंबईत धुवाँधार पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच अवघ्या काही तासात मुंबईतील रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झाला. पावसामुळे काल रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. काल रात्रभर मुंबईत पाऊस सुरू होता. आज सकाळीही मुंबईत सकाळी 10 वाजेपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने उघडीप घेतली आहे.