Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | शिवसेना, धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळेल?
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर, ठाकरे गटानं आणखी एक मोठा दावा केलाय. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं परत आम्हालाच मिळेल, असा दावा, उद्धव ठाकरे आणि अनिल परबांनी केलाय. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल देताना, सुप्रीम कोर्टानं निकालात जे मुद्दे मांडलेत, त्यानंतर ठाकरे गटानं आता पुन्हा पक्ष आणि चिन्हं आम्हालाच मिळेल, असा आशावाद व्यक्त केलाय. कारण निवडणूक आयोगाचे काही मुद्दे सुप्रीम कोर्टानं खोडून काढलेत. निवडणूक आयोगानं, 17 फेब्रुवारीला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदेंना दिलं. निवडणूक आयोगानं निकाल पत्रात म्हटलं होतं की 21 जून 2022 रोजी 55 पैकी 24 आमदार उद्धव ठाकरेंसोबत होते आणि त्याच दिवशी ठाकरे गटानं अजय चौधरींची गटनेतेपदी निवड केली आणि सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षाचा निकाल देताना, अजय चौधरींची गटनेते म्हणून निवड योग्य ठरवली तर मुख्यमंत्री शिंदेंची गटनेते म्हणून निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटलं.
शिंदेंच्या शिवसेनेनं प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवड केली. मात्र ही निवड सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. तसेच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची निवड ही योग्य असल्याचं म्हटलं. त्यामुळे त्यांचाच व्हीप लागू होईल हेही स्पष्ट केलं. शिंदेंनी 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 खासदार असल्याचं सिद्ध केलं, परिस्थिती आणि पुरावे याच्या आधारे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना देण्यात येत आहे, असं निवडणूक आयोगानं म्हटलं.
निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधातील याचिकेवर सुनावणी होणार
दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या आधारे पक्ष ठरवला जावू शकत नाही. विधानसभेतले लोकप्रतिनिधी आणि पक्ष ही वेगवेगळी बाब आहे. पक्षाची घटना महत्वाची आहे, असं सुप्रीम कोर्टानं निकालात म्हटलंय. विशेष म्हणजे नेमका पक्ष कोणता, याच मुद्द्यावर राज ठाकरेंनीही बोट ठेवलंय. आता निवडणूक आयोग काय करणार? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात एक याचिका दाखल आहे, त्यावर पुढच्या आठवड्यापासून सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या कृतीवर कडक ताशेरे ओढले. पण तरीही सरकार टिकलं. मात्र ही लढाई इथंच संपलेली नाही. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनात 16 अपात्र आमदारांची लढाई सुरु राहील आणि शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण चिन्हांसाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होईल.
या सगळ्या घडामोडी पाहता आता शिवसेना पक्ष अंतिमत: कोणाच्या ताब्यात राहणार ते आगामी काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात घेतल्याने उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचं पुन्हा दार ठोठावण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.