मशाल तिथं संथ गतीने मतदानाचा आरोप, ठाकरेंविरोधात शेलारांची तक्रार
मुंबईत काल अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांनी यावरुन भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप देखील केले. तर दुसरीकडे आचारसंहितेचा भंग केल्याने आशिष शेलार यांनी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
काल मुंबईसह राज्यातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं. मात्र मशालवर जिथं मतदान होत होतं, त्याच ठिकाणी संथ गतीनं मतदान झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. त्यावरुन भाजपच्या आशिष शेलारांनी निवडणूक आयोगात ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केलीये. उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या संथ गतीच्या मतदानावरुन भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप केले. त्यावरुन भाजपच्या आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आयोगात तक्रार दाखल केली. उद्धव ठाकरेंची वक्तव्यं खोटी आणि दिशाभूल करणारी असून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप शेलारांनी केला आहे.
सोमवारी मुंबईतल्या सर्व 6 लोकसभा मतदारसंघासह, ठाणे आणि कल्याण, पालघर अशा एकूण 13 ठिकाणी मतदान झालं. पण ज्या ठिकाणी शिवसेनेची मशाल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवारांना मतं पडत होती, त्याच ठिकाणी मुद्दाम मतदान संथ गतीनं केल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे.
मुंबईत 3 ते 4 तास मतदानासाठी लागले ही तर वस्तुस्थिती आहेत. स्वत: मतदारांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया ऑन कॅमेरा सांगितल्या. काही ठिकाणी तर मतदान न करताच वैतागून मतदार घरी परतले.
मतदान केंद्रावरील सोयी सुविधा आणि मतदान संथ गतीनं केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंचाच नाही. तर भाजपचाही आहे. स्वत: भाजपचेच उमेदवार पियूष गोयलही संतापले. आणि फडणवीसांनीही निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार केली. तर आता मुख्यमंत्री शिंदेंनीही मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील 5 व्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी घटली त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का ? मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा परिणाम मतदानावर झाला का ? 5 व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेसी काळजी घेतली नव्हती का ?
मतदानाची टक्केवारी कमी का झाली आणि प्रशासनं कुठं कमी पडले याची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 5 व्या टप्प्यात एकूण 55 टक्के मतदान झालंय. मुंबईत मोठ्या प्रमाणात मतदार भर उन्हात घराबाहेर पडले. तशा रांगाही दिसल्या. पण मतदारांना ताटकळत राहावं लागलं हे सत्ताधारीही सांगत आहेत.