शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, ‘सिल्व्हर ओक’वर मॅरेथॉन बैठक’? चर्चांना उधाण
महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या विविध राजकीय घडामोडींदरम्यान आज एक महत्त्वाची घडामोड घडलीय.
दिनेश दुखंडे, मुंबई : महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या विविध राजकीय घडामोडींदरम्यान आज एक महत्त्वाची घटना समोर आलीय. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोन बड्या नेत्यांची आज पुन्हा एकदा भेट झालीय. या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलंय. महाविकास आघाडीचा येत्या 17 डिसेंबरला राज्य सरकारविरोधात मोठा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवल्याची माहिती समोर आलीय.
दुसरीकडे कर्नाटक सीमावादावरुन राजकारण तापलंय. सीमावादावरुन आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे सुरु असताना आज गुजरातमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात भेट झालीय.
या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालीय. त्यामुळे या भेटीकडे राजकीय अभ्यासक आणि पत्रकारांचं लक्ष केंद्रीय झालंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय.
शरद पवार यांचा आज 83 वा वाढदिवस आहे. या निमित्तानेच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. पण या भेटीमागे आणखी राजकीय चर्चा होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार सचिन अहिर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. या दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालीय.
राज्याच्या दोन बड्या नेत्यांची भेट म्हणजे ही साधीसुधी भेट मानली जात नाही. या भेटीचे अनेक वेगवेगळे तर्क लावले जातात. त्यामुळे या भेटीत जी चर्चा झालीय त्या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.