राजकीय घडामोडींना वेग? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर; काय आहे कारण?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी उद्धव ठाकरे रिगल सिनेमासमोरील शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करतील.
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीची आज युती होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा आज दुपारी हे दोन्ही नेते करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील समीकरणे बदलणार आहे. या युतीची सामाजिक आणि राजकीय दूरगामी परिणाम होणार आहेत. आज ही मोठी राजकीय घटना घडत असतानाच आणखी एक मोठी राजकीय घटना घडणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आज संध्याकाळी 6 वाजता विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने हे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडणार आहे.
सत्तांतरानंतर पहिल्यांदाच भेटणार
या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्याच्या संभाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे-ठाकरेही पहिल्यांदाच एकत्र
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज ठाकरे हे चारही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येत असल्याने याकडेही सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटीलही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीकडे लक्ष
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी उद्धव ठाकरे रिगल सिनेमासमोरील शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर ते दादरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर उपस्थित राहतील. या ठिकाणी उद्धव ठाकरे बराच काळ उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातं.
त्यानंतर दुपारी दादरच्या आंबेडकर भवनात येऊन प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील. त्यानंतर उद्धव ठाकरे हे संध्याकाळी षण्मुखानंद येथे होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत. त्यामुळे विधान भवनातील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजेरी लावणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.