धक्कातंत्र… जळगावमधून उन्मेष पाटील नाहीच; कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात रणरागिणी मैदानात
भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उन्मेष पाटील हे जळगावमधून ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा होती. पण उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उन्मेष पाटील हे जळगावमधून ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा होती. पण उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर कल्याणमधून महिला शिवसैनिक वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रणरागिणी वैशाली दरेकर यांचा सामना होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामळी यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मशालीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने त्यांना तिकीट देण्यात आलं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
वैशाली दरेकर खासदार असतील
शिवसेनेने साधी माणसं मोठी केली. काही माणसं गद्दार निघाले. त्यांना मोठी करणारी ताकद शिवसेनेत राहिली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर या कल्याणच्या खासदार असतील. त्या सामान्य कुटुंबातील आहेत. शिवसेनेच्या रणरागिणी आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही धक्का देणारे
भूकंप होणार असं ऐकत होतो. आज कळलं भूकंप झाला. किडूकमिडूक गेलं तरी शिवसेनेला धक्का सांगितलं जात होतं. पण आज तुम्ही पाहिलं असेल. आम्ही राजकारणात बदल व्हावा म्हणून लढत आहोत. धक्का खाणारी शिवसेना नाही. शिवसेना जोरात धक्का देते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
हे खरं बंड
देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे. वापरा आणि फेका ही भाजपची वृत्ती आहे. त्याविरोधात आम्ही लढत आहोत. पण त्यांच्या पक्षातील लोकांना फेकून देण्याचं धोरण भाजपने अवलंबलं आहे. त्याविरूद्ध भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आव्हान दिलं. हे खरं बंड आहे. आमच्याकडे झालं ती गद्दारी होती. गद्दारी आणि बंड यात फरक आहे. जळगाव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. युतीच्या काळात आम्ही भाजपला हा मतदारसंघ देत आहे. जळगाव आम्ही घेतोय पण उन्मेष असेल तर लढायचं कसं हे आम्हाला वाटत होतं. पण ते शिवसेनेत आले. त्यांचं स्वागत करतो, असं ते म्हणाले.